मुलांना आपला वेळ द्या!

0
14

योगसाधना ः 634, अंतरंगयोग ः 211

  • डॉ. सीताकांत घाणेकर

प्रत्येक व्यक्तीने- विशेषतः पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी- जर शास्त्रशुद्ध योगसाधना केली तर विद्यार्थी-जीवनातील अनेक समस्या आपोआप दूर होतील. त्यासाठी पालकांना व शिक्षकांना वेगळे संस्कार देण्याची गरज नाही.

एक गोष्ट सर्वांनाच मान्य आहे, ती म्हणजे- आज विश्व प्रत्येक क्षेत्रात जलद प्रगती करीत आहे. घोडदौड चालू आहे. अनेकांना या शर्यतीमध्ये कसे तयार करायचे हे कोडे पडले आहे- स्वतःला व आपल्या मुलांना. प्रत्येकाच्या अपेक्षा फार उंचावल्या आहेत- पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या. मुलांनी चांगले शिकावे, आपल्या क्षेत्रात नाव कमवावे असे सर्वांनाच वाटते. ते साहजिकच आहे म्हणा. त्यामुळे अनेक पालक मुलांना चांगल्या महागड्या शाळेत पाठवतात जिथे फी लाखोंनी असते. पण थोडा विचार केला तर लक्षात येईल की प्रत्येक शाळेमध्ये तेच शिकवतात; पद्धत थोडी वेगळी असेल!

काही पालक मुलांना हव्या असलेल्या वस्तू लगेच आणून देतात. त्यामुळे त्यांना सगळे आयते मिळते. त्यांच्या मागण्या आणखी वाढतात. खरे म्हणजे पालकांनी विचार करायला हवा की आपल्या पाल्याला या वस्तूची खरोखर गरज आहे की नाही?
लहान मुले फार समजूतदार असतात. व्यवस्थित समजावले तर ती ऐकतात. हट्ट करीत नाहीत. पण दुर्भाग्य म्हणजे आज बहुतेक पालक त्यासाठी वेळ काढत नाहीत. याची कारणे अनेक आहेत- स्वतःची कामे, धंदा, पेशा ही तर आहेतच; पण फावल्या वेळात बहुतेकजण स्वतःचा वेळ टीव्ही, व्हॉट्सॲप, फेसबूक, इन्स्टाग्राम… अशा तथाकथित मीडियामध्ये गुंतवतात. त्यामुळे मुलांना वेळ देणे राहूनच जाते.
सुरुवातीच्या चौदा-पंधरा वयापर्यंत पालक मुलांसाठी आदर्श असतात. जसजसे वय वाढते, किशोरवय, पौगंडावस्था सुरू होते तसतसा संप्रेरकांचा परिणाम शरीरावर व्हायला लागतो. त्यांच्या मनातदेखील वेगवेगळे विचार यायला लागतात. या वयात आईवडिलांनी मुलांसाठी सर्वात जास्त वेळ देणे आवश्यक असते. फक्त त्यांच्या आवडीप्रमाणे वस्तू देणे, धन खर्च करणे बरोबर नाही. त्यांना संस्कार योग्य दिशेने देणे आवश्यक आहे.

आजकाल घरातील सदस्यांचाही एकमेकांशी संपर्क व संबंध कमी झालेला दिसतो. अनेकवेळा भोजनाच्या वेळी व टी.व्ही.वरचे कार्यक्रम बघताना एकत्र बसले तरी आपापसात बातचीत कमीच झालेली दिसते.
पालक व शिक्षकांना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आजची मुले फार वेगळी आहेत. त्यांची स्वतःबरोबर तुलना करू नका. प्रख्यात तत्त्ववेत्ता खलील जिब्रान म्हणतात की, ‘मुले या विश्वात पालकांकडून येतात; पण सृष्टिकर्ता त्यांना घडवतो तो भविष्यासाठी. त्याला भविष्यकाल कसा असेल हे माहीत असते. म्हणून चुकूनसुद्धा स्वतःचे भूतकाळातील जुनाट विचार त्यांच्यावर लादू नका. सृष्टिकर्त्याला त्यांच्यासाठी काय चांगले आहे हे माहीत आहे. त्याप्रमाणे तो त्यांना घडवणार. तुम्ही त्यांना चांगले संस्कार द्या. त्यांच्यासाठी वेळ द्या.’ प्रसिद्ध तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस म्हणतात की, ‘ज्या तुमच्या मुलांसाठी तुम्ही सगळे काही करता त्यांना तुमचा वेळ द्या.’
एक गोष्ट मान्य की, आजच्या विश्वाची घडणच अशी आहे, जिथे कुटुंबातील स्त्रियादेखील बाहेर कामे करतात. त्यावेळी आपण प्राथमिकता दाखवायला हवी. बदलत्या काळाप्रमाणे आम्हाला बदलावेच लागेल. पण योग्य दिशा महत्त्वाची आहे. स्वतःचा वेगदेखील वाढवायला हवा.

जग फार जलद गतीने पुढे जात आहे- अगदी क्षणाक्षणाला. त्यामुळे स्वतःच्या वेळेचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे, तरच आपण यशस्वी होऊ शकू. शास्त्रकार म्हणतात- ‘जी व्यक्ती वेळेला महत्त्व देते, जेव्हा वेळ येते तेव्हा वेळ त्या व्यक्तीला मदत करते.’
विश्वाची गती समजायला हवी तर मुंबईसारख्या शहरामधील रेल्वेगाड्यांतून प्रवास करायला हवा. एवढ्या गर्दीत आपण आत कसे चढणार व उतरणार याची तयारी आपणच करायला हवी. इतर व्यक्ती आम्हाला मार्गदर्शन करू शकतील, पण शेवटी आपणच आपली बुद्धी वापरायला हवी व वेग वाढवायला हवा. नाहीतर त्या गर्दीत डब्यात चढणे व परत उतरणे अशक्य होईल.
शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, ही गोष्ट पालकांनी, शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास. स्वामी विवेकानंद शिक्षणासंबंधी म्हणतात- ‘शिक्षण म्हणजे भांडे भरणे नव्हे तर आत जे आहे ते बाहेर काढणे.’ त्यासाठी ते योगमार्ग सांगतात- ‘ज्ञानयोग’, ‘भक्तियोग’, ‘कर्मयोग’, ‘राजयोग’ (अष्टांगयोग). प्रत्येक योगमार्गात विस्तृत ज्ञान आहे. योगसाधकांनी दरएक मार्गाचा सखोल अभ्यास करून स्वतःच्या जीवनात त्या गूढ ज्ञानाचा उपयोग केला तर सर्व पैलूंनी जीवनविकास होईल- व्यक्तीचा, समाजाचा व विश्वाचा.
यातील अष्टांगयोगामध्ये यम-नियम ही पहिली दोन अंगे आहेत.
यम ः व्यक्ती व समाज यांच्यासाठी सद्वर्तनाचे आदेश- अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आज आपण नैतिकतेचे शिक्षण देतो. तसे पाहिले तर हे पाचही आदेश या शिक्षणासाठीच आहेत.
नियम ः स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी, आत्मशासनासाठी आदेश- शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. या पाच आदेशांतदेखील नैतिक शिक्षण सामावलेले आहे.

त्याशिवाय पाचवे अंग म्हणजे प्रत्याहार. अर्थात पंच ज्ञानेंद्रिये ः रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श. पंच कर्मेंद्रिये ः हात, पाय, वाचा, उत्सर्जन इंद्रिये, जननेंद्रिये. या सर्वांवर व्यक्तीच्या मनाचे व बुद्धीचे संपूर्ण नियंत्रण अपेक्षित आहे.
स्वामी विवेकानंद म्हटले की ‘ब्रह्मचर्य’ या पैलूची आठवण होते. ब्रह्मचारी म्हणजे विवाह न करणारी व्यक्ती असे आपण गृहित धरतो. पण या शब्दाचा अर्थ एवढाच मर्यादित नाही, तर यासाठी सर्व इंद्रियांवर ताबा अपेक्षित आहे.
स्वामीजींच्या जीवनात ते अमेरिकेत असताना काही प्रसंग आले, जिथे त्यांच्या ब्रह्मचर्याचे दर्शन झाले. सर्वांसाठी- प्रामुख्याने विद्यार्थी जीवनात हा अत्यंत मुख्य सद्गुण आहे. म्हणून भारतीय जीवनात जे चार आश्रम आहेत- ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम- त्यांत विद्यार्थी जीवनात ब्रह्मचर्याचे महत्त्व आध्यात्मिक आहे.

स्वामी विवेकानंदांची बुद्धी प्रगल्भ होती. इतिहासकार सांगतात की त्यांनी एकही पुस्तक वाचलेले नाही. फक्त पाने चाळता चाळता त्यातील ज्ञान ते आत्मसात करीत, म्हणून त्यांना ‘फोटोग्राफिक मेमरी’ होती असे मानतात.
हल्लीच्या शिक्षणक्रमात ‘योग’ हा विषय सर्व शाळा-कॉलेजांमध्ये शिकवला जातो. पण बहुतेक वेळा काहीच पैलूंवर जास्त भर दिला जातो. उदा. आसने, कपालभाती, प्राणायाम, ध्यान वगैरे. तेदेखील कर्मकांडात्मक. त्यामागील तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला जात नाही. ते तत्त्वज्ञान आचरणात आणले जात नाही. प्रत्येक व्यक्तीने- विशेषतः पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी- जर शास्त्रशुद्ध योगसाधना केली तर विद्यार्थी-जीवनातील अनेक समस्या आपोआप दूर होतील. त्यासाठी पालकांना व शिक्षकांना वेगळे संस्कार देण्याची गरज नाही.