मुलांचे लवकर लसीकरण हेच प्राधान्य

0
30

>> पंतप्रधान मोदी; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

कोरोना विषाणूच्या ताज्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही ही सत्य परिस्थिती आहे. ओमिक्रॉन आणि त्याचे सर्व प्रकार कशी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात, हे आपण युरोपातील देशांमध्ये पाहू शकतो. त्यामुळे सर्व पात्र लहान मुलांचे लसीकरण लवकरात लवकर करणे हे आमचे प्राधान्य असेल. त्यासाठी पूर्वीप्रमाणेच शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनीकाल कोविड संदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. कोविडबाबतीत गेल्या दोन वर्षांत पंतप्रधानांनी घेतलेली ही २४ वी बैठक होती.

कोविड संकट चांगल्या प्रकारे हाताळूनही आपल्या काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्येमध्ये वाढ पाहत आहोत. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावे लागेल. कोविडचे संकट अद्याप टळलेले नाही. मोठ्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने पालक चिंतेत आहेत. काही शाळांमधील विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे; मात्र आता लहान मुलांना देखील कोरोना लस देण्यात येणार आहे, ही समाधानाची बाब आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, या बैठकीत मोदींनी इंधनाच्या दरांबद्दल चिंता व्यक्त करताना भाजपाची सत्ता नसणार्‍या राज्यांची नावे घेत या राज्यांमधील इंधनाचे दर अधिक असल्याचे अधोरेखित केले. मोदींनी या राज्यांना इंधनावरील कराची टक्केवारी कमी करण्याचे आवाहन केले.

सार्वजनिक ठिकाणी मास्क
वापरावा लागेल : मुख्यमंत्री

राजधानी दिल्लीसह पाच राज्यांत कोविड महामारीचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा लागणार आहे; पण मास्क वापरण्याची सक्ती नसेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतलेल्या कोविड परिस्थिती आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.