मुरगाव बंदरविषयक सुनावणीसाठी वास्को सज्ज

0
82

>> आजपासून तीन दिवस टिळक मैदानावर आयोजन

मुरगाव बंदरातील साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेडच्या धक्का क्रमांक ५-अ व ६-अ ची टर्मिनलची क्षमता वाढविण्यासंबंधीची जनसुनावणी आज दि. २६ रोजी, गाळ उपसा करणे (ड्रेजिंगची) सुनावणी दि. २७ रोजी तर धक्क्याचा विस्तार यासंबंधीची जनसुनावणी दि. २८ रोजी वास्को येथील टिळक मैदानावर आयोजित असून यासाठी मैदान सज्ज झाले आहे.
पर्यावरण आघात अहवाल अधिसूचनेच्या संदर्भात एमपीटीने यापूर्वी दि. २० रोजी वास्को टुरिस्ट हॉस्टेलच्या सभागृहात आयोजिलेली जनसुनावणीची जागा अत्यंत अपुरी असल्याचा दावा करून ओल्ड क्रॉस फिशींग कॅनोई ऑनर्स सोसायटी व गोयच्या रापणकारांचो एकवोट या संघटनांनी ही मागणी केली होती. सुनावणीसाठी ६० हजारापेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याने वास्को रेसिडेन्सी हे सभागृह तोकडे पडेल असा दावा केला होता. वास्को येथे ६० हजार मच्छीमार आहेत. साकवाळ, चिखली व इतर भागातील मच्छीमारांना कोळशाचे प्रदूषण, मासळी उत्पादनात होत चालेलेली घट, किनार्‍यांची धूप या समस्या सतावत आहेत. त्यामुळे या सार्वजनिक सुनावणीला मोठ्या संख्येने मच्छीमार, नागरिक उपस्थित राहणार आहेत.
मुरगाव बंदरातील कॅनल वाढवण्याच्या गाळ उपसा प्रकल्पासाठी वन व पर्यावरण मंत्रालयाने एमपीटीला दिलेली परवानगी राष्ट्रीय हरित लवादाने रद्दबातल ठरवली होती. लवादाच्या या आदेशाच्या विरोधात एमपीटीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत लवादाने केलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक जनसुनावणी घेण्यात येईल असे निवेदन एमपीटीच्या वकीलांनी केले होते. त्यानुसार ही सार्वजनिक सुनावणी २६,२७ व २८ असे तीन दिवस येथील टिळक मैदानावर घेण्यात येणार असून यासाठी पूर्वतयारीनिशी मैदान सज्ज झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या नियोजित विस्तारीकरणाला विरोध करण्याचा निर्णय येथील सामाजिक संस्था, मच्छीमारी बांधवांची संघटना व इतरांनी घेतला आहे. त्यासंबंधी तयारी पूर्ण झाली असून यावेळी काही दस्तऐवज व अहवाल जनसुनावणीत ठेवण्यात येणार आहे.