मुरगाव पालिकेची ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम

0
151
वर्णापूरी राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविताना पालिका कामगार.

वास्को (न. प्र.)
मुरगाव पालिकेने भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी केलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम बुधवारपासून सुरू केली असून काल आपला मोर्चा वरूणापूरी येथे वळवला. तिथे राष्ट्रीय महामार्गाच्या आड येणारी तसेच राष्ट्रीय महामागांवर अतिक्रमण करून बेकायदा उभे केलेले हातगाडे तसेच इतर गाडे जप्त करण्यात आले. या दोन दिवसांत बरीच अतिक्रमणे दूर केल्याने वास्कोवासीयांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या काही वर्षात अशा प्रकारची मोहीम पालिकेने हाती न घेतल्याने बेकायदा गाड्यांना ऊत आला होता. भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकानांची उंची आणि लांबी वाढवली. तसेच दुकानासमोरच्या रस्त्यावरच माल विक्री सुरू केली आहे. यामुळे या मार्केटमध्ये येणार्‍या ग्राहकांना त्रास होत होता. यासंबंधी काही सामाजिक संस्थानीही तक्रारी केल्याने पालिकेवर दबाव आणून भाजी मार्केटमधील अतिक्रमण हटविण्यास आरंभ केला. पोलीस बंदोबस्तात पालिका कामगारांनी भाजी मार्केटमधील अतिक्रमण हटविण्यास आरंभ केला. अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे भाजी, फळ विक्रेत्यांची धावपळ उडाली. पालिका कामगारांनी विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवून पत्रेण ताडपत्र्या, बांबू तसेच इतर सामान जप्त केले. काहीजणांनी स्तव: अतिक्रमण हटविले. अतिक्रमण हटविल्याने रस्ता ग्राहकांसाठी मोकळा झाला.
दरम्यान, पालिकेने आपला मोर्चा वर्णापुरी येथे राष्ट्रीय महामार्गावर वळवून तेथे बेकायदा थाटलेले गाडे तसेच महामार्गाच्या आड येणारे बेकायदा व्यवसायिकांचे गाडे सकाळी पोलीस बंदोबस्तात जप्त करून वाहनात भरले. या गाड्यांमुळे या राष्ट्रीय महामार्गावर धावणार्‍या वाहन चालकांना भरपूर त्रास सहन करावा लागत असे. कित्येक वेळा या महामार्गावर अपघातही या गाड्यांमुळे घडले. वर्णापूरी, बायणा, सडा या राष्ट्रीय महामार्गाआडही सदर गाडे येत होते. काही सामाजिक संस्थांनी तसेच लोकांच्या तक्रारीला अनुसरून नगराध्यक्षा भावना नानोस्कर आणि मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी पुढाकार घेऊन ही मोहीम राबविली. मात्र ही मोहीम दोन दिवसापुूरती न ठेवता पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी पालिका निरीक्षकांनी लक्ष ठेवावे. असे मत काहींनी व्यक्त केले. ही मोहीम पालिका निरीक्षक सचिन पडवळ, योगेश देसाई, सेबेस्ताव पेरेरा, शामू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.