>> राज्य माहिती आयुक्तपदी संजय ढवळीकर
राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी माजी सभापती ऍड. विश्वास सतरकर आणि राज्य माहिती आयुक्तपदी संजय ढवळीकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
राज्यातील मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तपद गेल्या कित्येक महिन्यापासून रिक्त आहे. सरकारने या दोन्ही पदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. राज्य सरकारच्या एका समितीने दोन्ही पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी करून दोन्ही पदासाठी उमेदवारांची नावे निश्चित करून राज्यपालांच्या मान्यतेसाठी फाईल पाठविली होती.
मुख्य माहिती आयुक्तपदी निवड करण्यात आलेले ऍड. विश्वास सतरकर हे गोवा विधानसभेचे माजी सभापती आहेत. ते प्रियोळ मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. वर्ष २००२ ते २००५ या काळात गोवा विधानसभेचे सभापती म्हणून कामकाज पाहिजे आहे. ऍड. सतरकर हे गोवा राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत.
तर, राज्य माहिती आयुक्तपदी निवड करण्यात आलेले संजय ढवळीकर हे पत्रकार आहेत. ढवळीकर हे पत्रकारितेमध्ये ३० वर्षे कार्यरत आहेत. तसेच, त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले आहे.
माहिती हक्क कायद्याच्या चौकटीत कामकाज करून नागरिकांना न्याय मिळवून देणार आहे. नागरिकाचा माहिती मिळविणे हा हक्क आहे. माहिती हक्क कायद्याबाबत जनजागृतीवर भर दिला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त ऍड. विश्वास सतरकर यांनी व्यक्त केली.