म्हादईप्रश्नी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत व त्यांच्या मंत्रिमंडळाला अपयश आलेले असून त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबरच त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, अशी मागणी काल अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केली.
म्हादईप्रश्नी कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पाला जे ‘ईसी’ देण्यात आलेले आहे त्याचा फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट केल्याच्या पार्श्वभूमीवर खंवटे यांनी वरील मागणी केली आहे.
गोवा सरकारचा पराभव
केंद्राने कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पाला दिलेली ईसी मागे घ्यावी अशी मागणी प्रकाश जावडेकर यांच्याकडे राज्य सरकारने केलेली असली तरी अजून ती मागे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या कामी गोवा सरकारचा पराभव झालेला आहे हे सिद्ध झालेले आहे असे खंवटे म्हणाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी राजीनामा देणेच योग्य ठरणार असल्याचे खंवटे म्हणाले.
कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम सुरू झालेले असून ते बंद पाडणे याला प्राधान्य द्यायला हवे, असेही खंवटे म्हणाले.
प्रमोद सावंत हे आपल्या पदाला मान देऊ शकत नसून त्यामुळेच त्यांनी मानाने आपले पद सोडावे, अशी मागणीही खंवटे यांनी केली.