मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

0
14

भेटीचा उद्देश; चर्चेचा तपशील गुलदस्त्यात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावल येथील राजभवनात काल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतल्याने राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषयावर जोरदार चर्चेला उधाण आले. मात्र मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गोवा विद्यापीठाशी संबंधित असलेल्या एका विषयावरून राज्यपालांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय चर्चेचा बनलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतल्यानंतर काल राज्यपालांची भेट घेतल्याने मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर चर्चेला ऊत आला. मंत्रिमंडळात कुठल्याही क्षणी फेरबदल होतील, असे वृत्तही पसरले; मात्र मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही.

कोणत्या विषयावर चर्चा?
राज्य सरकारने पणजीत कार्यरत असलेले फार्मसी महाविद्यालय, कला महाविद्यालय, वास्तुशिल्पकला आणि संगीत महाविद्यालयाचे ताळगाव येथे गोवा विद्यापीठाच्या आवारात स्थलांतर करण्याचा निर्णय 2025-26 च्या अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. या चार महाविद्यालयांसाठी ताळगाव येथे गोवा विद्यापीठाच्या जागेत एक वेगळा कॅम्पस उभारण्याचा प्रस्ताव आहे. राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असल्याने या विषयावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांशी चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.