मुख्यमंत्री सावंत यांची दिल्लीत गडकरींशी महामार्गासंबंधी चर्चा

0
250

नवी दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडकरी यांना अनमोड घाट व मोले येथील अभयारण्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाला गोव्यातून होत असलेल्या विरोधाची माहिती दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, अनमोड घाट व मोले अभयारण्यातून जाणार्‍या महामार्गाला लोकांकडून विरोध होऊ लागला आहे. या महामार्गामुळे झाडे कापावी लागणार असल्याने गोव्यातील लोकांकडून या प्रकल्पाला विरोध होत असल्याचे आपण काल गडकरी यांच्या नजरेस आणून दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सडा ते वर्णापुरी या महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणीही आपण गडकरी यांच्याशी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्याशी उद्योग व विकासकामांची चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हेही हजर होते.