आपल्या खासगी कामानिमित्त ऑस्ट्रियाच्या दौर्यावर गेलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उद्या सोमवार दि. ८ रोजी गोव्यात परतणार असल्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल सांगितले.
चतुर्थीनंतर लगेच म्हणजे १ सप्टेंबर रोजी ते ऑस्ट्रियाकडे रवाना झाले होते. जाताना त्यांनी ताबा आपणाकडे दिला होता असे डिसोझा म्हणाले.
आठवड्याची सुटीही न घेता आठवडाभर रोज १६ तास काम करणार्या मनोहर पर्रीकर यांना या दौर्यानिमित्त कित्येक महिन्यानंतर थोडीसी विश्रांती मिळणार असल्याचे डिसोझा म्हणाले. आम्ही सगळे मंत्री दर रविवारी सुटी घेत असतो. मात्र, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्याला अपवाद असल्याचे डिसोझा म्हणाले. त्यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून मार्च २०१२ पासून त्यांनी कधीही विश्रांती अशी घेतलीच नाही. किंबहूना विश्रांती हा शब्द त्यांच्या शब्दकोषात नसल्याचे ते म्हणाले. शनिवार व रविवारीही ते कामात व्यस्त असतात.
विविध सरकारी फाईली तपासून पाहण्याचे त्यांचे काम आठवडाभर काम चालू असते. त्यांनी कधीतरी थोडी विश्रांती घ्यावी असे आम्हा मंत्र्यांना सदैव वाटत असते. पण त्यांना प्रत्येक दिवशी फाईली हाताळण्याची सवय झाली आहे. मागच्या वेळी जेव्हा ते मुख्यमंत्री बनले होते तेव्हाही त्यांची कार्यपध्दती अशीच होती. त्यांच्या या कार्यपध्दतीमुळे जनतेची कामे वेगाने होत असतात. पण ती करताना ते आपल्या आरोग्याकडे जराही लक्ष देत नसतात, असे फ्रान्सिस डिसोझा म्हणाले. पर्रीकर नसल्याने गेल्या १ सप्टेंबरपासून ताबा आपणाकडे होता पण चतुर्थीचा काळ असल्याने कामाचा ताण नव्हता, असे ते शेवटी म्हणाले.