गोव्याच्या पर्यावरणाशी जुळती झाडे लावणार

0
115

निलगिरी व आकेशियाची झाडे कापणार
काणकोण तालुक्यातील करमलघाट येथील वनक्षेत्रासह, केपे, सत्तरी, सांगे आदी तालुक्यांतील वन क्षेत्रात असलेली निलगिरी व आकेशियाची झाडे कापून टाकून त्या जागी गोव्याच्या पर्यावरणाशी मिळती जुळती अशी माट्टी, किडाल, जांभूळ, आवळा, भिरंड (कोकम), नानो आदी झाडे लावण्याचे काम वन खाते हाती घेणार असल्याचे राज्याचे मुख्य वनपाल रिचर्ड डिसोझा यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
वर्षभरात वन खाते हे काम हाती घेणार आहे व ते टप्प्याटप्प्याने होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम वर्षभरात सुरू होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले की आकेशिया जातीची झाडे कुठेही वाढतात. पडिक जमिनीत जेथे कुठल्याही प्रकारची झाडे वाढत नाहीत तेथे झाडे वाढावीत यासाठी आकिशिया अशा ठिकाणी लावल्यास त्याचा फायदा होता. मात्र, तसे असले तरी त्यानंतर आकिशियाची झाडे कापून टाकणेच हे चांगले असते. कारण ही चांगल्या जातीची झाडे नसल्याचे ते म्हणाले. निलगिरीच्या झाडांचाही मोठा फायदा नाही. त्यामुळे आकिशिया व निलगिरीची झाडे कापून टाकण्याचा वन खात्याने निर्णय घेतलेला असून त्या जागी मोठ्या संख्येने राज्य वृक्ष असलेल्या माट्टीची झाडे, जांभळांची झाडे, आवळ्याची झाडे, भिरंडची (कोकम) झाडे, किडालची झाडे अशा झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.