मुक्तीचळवळ आणि गोमंतकीय ख्रिस्ती नेतृत्व

0
99

वाल्मिकी फालेरो

गोव्याच्या मुक्तीलढ्यातील ख्रिस्ती नेत्यांचे योगदान बऱ्याचदा दुर्लक्षित केले जाते. हिंदूंप्रमाणेच गोमंतकीय ख्रिस्ती समाजाच्या एका घटकाने भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आणि गोव्याच्या मुक्तीसाठी अथक प्रयत्न केले. वाल्मिकी फालेरो यांच्या ‘गोवा, 1961 ः द कम्प्लीट स्टोरी ऑफ नॅशनलिझम अँड इंटिग्रेशन’ या पेंग्वीन रँडमहाऊस प्रकाशित नव्या कोऱ्या पुस्तकातील एका प्रकरणाचा अनुवाद –

लुईस दी मिनेझिस ब्रागांझा यांनी 1910 मध्ये गोव्याच्या स्वायत्ततेसाठी आवाहन केले. 1918 मध्ये त्यांनी मडगाव येथील एका सभेत स्वातंत्र्याची मागणी केली. 1928 मध्ये, पॅरिसहून परतलेले त्यांचे अभियंता असलेले चुलत भाऊ, गोव्याच्या राष्ट्रीयत्वाचे जनक, टी. बी. कुन्हा यांनी गोवा नॅशनल काँग्रेसची गोव्यात राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी स्थापना केली. मूळ गोव्याचे असलेल्या पोर्तुगालस्थित सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. सँड्रा अताइद लोबो यांनी ‘द रिटर्न टू इंडियननेस’ या निबंधात लिहिले आहे की, 1920 च्या दशकाच्या सुरुवातीला, टी. बी. कुन्हा यांनी फ्रेंच वृत्तपत्रांमध्ये, विशेषतः क्लार्टे आणि ल’युरोप नोवेल सारख्या नियतकालिकांमध्ये त्यांची वसाहतवादविरोधी मते मांडली होती. टी. बी. कुन्हांचे ज्येष्ठ बंधू, फ्रान्सिस्को डी ब्रागान्झा कुन्हा, ज्यांनी लंडनमध्ये आणि नंतर पॅरिसमधील सॉर्बोन येथे शिक्षण घेतले, त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या राष्ट्रवादी विचारांचे भाषांतर केले होते आणि त्यांना शांतिनिकेतन येथे शिकवण्यासाठी आमंत्रित केले गेले. सर्वात ज्येष्ठ, व्हिन्सेंट डी ब्रागांझा कुन्हा हे देखील एक सक्रिय राष्ट्रवादी होते. विशेष म्हणजे, राजकीय सक्रियता आणि गोव्यातील स्वातंत्र्याची उत्कट इच्छा युरोपमध्ये आधी प्रकट झाली.

पोर्तुगालमध्ये आदेवोदातो बार्रेटो, आयरिश ग्रासियस, आंतोनियो दी नरोन्हा, आंतोनियो फुर्तादो, बेनेडीट फुलगेन्सिओ डी ब्रिटो, सिप्रियानो दा कुन्हा गोम्स, ड्रुस्टन रॉड्रिग्ज, फर्नांडो दा कोस्ता, ज्योकिम ओटो झेवियर डी सिक्वेरा कुतिन्हो, ल्युसिओ डी मिरांडा, तेलू मास्करेन्हस (एकेकाळी कोईम्ब्र विद्यापीठातील सालाझारचे विद्यार्थी, पद्मश्रीने सुशोभित, ज्यांनी ‘व्हेन द मँगो ट्रीज ब्लॉसम्ड’ नावाचे आत्मचरित्र लिहिले होते.) आणि झाकारियस आंतांव हे गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणारे विद्यार्थी होते. पोर्तुगीज प्रसारमाध्यमांनी त्यांना कम्युनिस्ट ठरवले.

डॉ. आताईद लोबो म्हणतात की वैद्यकीय विद्यार्थी सांतान रॉड्रिग्ज याने इम्प्रेन्सा दा मानहा आणि डायरिओ द नोटिसियास या पोर्तुगीज दैनिकांना भारतीय संस्कृतीचे प्राचीन वैभव आणि ब्रिटीश निघून गेल्यानंतर स्वीकारले जाणार असलेले संघराज्य याविषयी अवगत केले. 1926 मध्ये त्याची मते ‘द इंडियन नॅशनल मुव्हमेंट’ या पुस्तकातून प्रकाशित झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या गोव्याच्या कॅथलिक राष्ट्रवाद्यांनी प्रजासत्ताकातील घटनात्मक समानतेचे रूपांतर गोव्यातील व्यावहारिक असमानतेमध्ये झाले असल्याचा निषेध केला. त्यांनी नागरिकत्वाच्या समीकरणात सर्व गोवावासियांना, विशेषतः हिंदूंना आणि नव्या काबीजादींमधील लोकांना समान वागणूक देण्याचे आवाहन पोर्तुगीज सत्तेला केले. डॉ. राममनोहर लोहिया यांना गोव्यात आणणारे आणि 1946 मध्ये गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याला पुनरुज्जीवित करणारे असोळणेचे डॉ. जुलियांव डी मिनेझिस हे होते.

गोवा हे पोलिसी राज्य असल्याने, गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी मुंबई आणि बेळगावमध्ये विविध संघटना उदयाला आल्या. मुंबई गटांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन मुख्यत्वे गोव्याच्या कॅथलिकांकडून झाले. मुंबईतील गोव्याच्या कॅथलिक राजकीय नेतृत्वाने स्थानिक बंडखोरी निर्माण करण्याच्या उद्देशाने 1953 मध्ये गोव्याची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी नेहरूंवर दबाव आणला. फ्रान्सिस्को मास्करेन्हस आणि वामन देसाई यांनी त्यांच्या युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्सच्या स्वयंसेवकांसह 22 जुलै 1954 रोजी दादरा ताब्यात घेतले. 2 ऑगस्ट 1954 पर्यंत नगरहवेली मुक्त करण्यात गोवा पीपल्स पार्टीचे जॉर्ज वाझ सक्रिय सहभागी होते. 15 ऑगस्ट 1954 रोजी तेरेखोल, बांदा आणि पोळे येथे झालेल्या सत्याग्रहाचे आयोजन भारताच्या प्रजासमाजवादी पक्षाचे एक प्रमुख सदस्य, गोव्याचे कॅथलिक पीटर अल्वारीस यांनी केले होते. सत्याग्रहींच्या तिन्ही गटांचे नेतृत्व अनुक्रमे आल्फ्रेड आफोन्स, मार्क फर्नांडिस आणि अँथनी डिसोझा या गोव्याच्या कॅथलिकांनी केले होते. जून 1957 मध्ये जेव्हा नेहरू पहिल्यांदा नवी दिल्लीत गोवा मुक्ती चळवळीच्या नेतृत्वाच्या विविध वर्गांना भेटले, तेव्हा त्यांना भेटणाऱ्या अकरा नेत्यांपैकी सात जण गोव्याचे कॅथलिक होते. एप्रिल 1961 मध्ये कासाब्लांका परिषदेसाठी नियुक्त केलेल्या गोव्यातील पाच नेत्यांपैकी चार गोव्यातील कॅथलिक होते.ऑक्टोबर 1961 मध्ये नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये वसाहतवादावरील चर्चासत्रासाठी आमंत्रित केलेल्या गोव्यातील तिघांपैकी दोन गोव्यातील कॅथलिक होते.

मडगावच्या डॉ. गॅम्बेटा दा कोस्टा यांच्या नेतृत्वाखाली सालसेतमधील प्रमुख ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या गटाने 1940 च्या दशकात गोव्याच्या स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष तापला तेव्हा स्वतः गांधीवादी होण्याचा निर्णय घेतला. बहुतेक कॅथलिक-जसे की डॉ. कॉन्स्टॅन्सिओ रॉक मोंतेरो, एक माजी तालुका प्रशासक आणि नागवे, वेर्णाचे एक अतिशय लोकप्रिय वैद्यकीय व्यावसायिक, लोटलीचे डॉ. बारोनिओ मोंतेरो आणि आकें बायशचे डॉ. पेरेग्रिनो दा कोस्टा- यांनी जणू घड्याळाचे काटे चारशे वर्षे मागे नेले. त्यांच्या धर्मांतरित पूर्वजांना जबरदस्तीने त्यांच्या मूळ पोशाखाची पद्धत पाश्चात्य पोशाखात बदलण्यास भाग पाडले गेले होते, त्याचे स्मरण ठेवून ते खादीचा कुर्ता-पायजमा धारण करू लागले व बऱ्याचदा त्यावर गांधी टोपीही असायची. ॲलोपथिक डॉक्टर असूनही आयुर्वेदिक उपचारपद्धतीची निवड करणारे आणि गोव्याच्या उष्ण आणि दमट हवामानात पाश्चिमात्य सूट घालण्यासारख्या पोर्तुगीज संस्कृतीच्या काही पैलूंविरुद्ध लढा देणारे डॉ. बारोनिओ मोंटेरो यांनी वैद्यकीय डॉक्टरांकडून सुती गाउन वापरण्याचे समर्थन केले. पोर्तुगीज राजवटीत एकवेळ हाताने विणलेली खादी आणि कुर्ता-पायजमा चालवून घेतला जाई, पण गांधी टोपी तर पोर्तुगीज गोव्यातील गोव्याच्या कॅथलिकांसाठी निषिद्ध होती. पण म्हापसा कोर्टात गांधी टोपी काढून टाकण्यास नकार दिल्याबद्दल, स्वातंत्र्यसैनिक फ्रँक राफेल पॉल आंद्राईद यांचे पर्रा येथील घर जप्त केले गेले आणि वसाहतवादी राजवटीने ते लिलावात विकले. स्वातंत्र्यसैनिक व्हिसेंट आगुस्तिन फ्रान्सिस्को दा कुन्हा यांची गांधी टोपी पोर्तुगीज पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी हिसकावून घेतली आणि तिने स्वतःचे बूट पुसून ती परत केली… व्हिन्सेंट कुन्हा यांनी जय हिंद म्हणत ती परत घेतले! देणग्यांसाठी ती फिरवण्यात आली आणि त्या टोपीत देणगीची 200 रुपयांची रक्कम गोळा झाली. कुन्हा यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात तागाचा सूट, टाय आणि बूट घालणे कधीही सोडले नाही; पोर्तुगीज काळात त्यांच्या या पोशाखावर ते गांधी टोपी धारण करीत असत.

भारताच्या पुनरुत्थानाच्या या प्रतीकांबद्दल पोर्तुगिजांचा तिरस्कार हा तीव्र होता. गोव्याचे कॅथलिक, गांधी टोपी घालणारे सालसेतमधील बहुतेक डॉक्टर हे नोंदणीकृत स्वातंत्र्यसैनिक नव्हते. 70 च्या दशकाच्या मध्यास गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पेरलेले बियाणे अजूनही कडू फळ देत आहे. वस्तुस्थितीच्या उघड विरोधाभासात अजूनही ख्रिस्ती समाजावर टीका होत असते. गोव्याचे कॅथलिक, 1987 मध्ये डझनभर स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याच्या कॅथलिकांनी गोव्याच्या मुक्तीचे स्वागत केले नाही या अपप्रचाराचा तीव्र निषेध केला. त्यांनी पोर्तुगीज वसाहतवादाविरुद्ध गोव्याच्या कॅथलिकांनी सतराव्या ते विसाव्या शतकापर्यंत केलेल्या विरोधाचा इतिहास दाखवून दिला. नॅशनल काँग्रेस गोवा, युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स, गोवा पीपल्स पार्टी, आझाद गोमांतक दल, गोवा लिबरेशन कौन्सिल आणि गोवा नॅशनल युनियन यांच्या नेतृत्वाखालील मुंबईतील गोवा मुक्तीचळवळ ही रचना आणि दिग्दर्शन या दोन्ही बाबतींत 90 टक्क्‌‍यांहून अधिक गोव्यातील ख्रिस्त्यांनी चालवली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. गोव्यातील कॅथलिक समुदायाने विसाव्या शतकातील स्वातंत्र्यलढ्याला गुणवत्तापूर्ण -नेतृत्व आणि दिशा- तसेच संख्याबळ प्रदान केले. अधिकृत नोंदींमध्ये गोव्याच्या 116 नोंदणीकृत कॅथलिक स्वातंत्र्यसैनिकांची यादी आहे, तर या लेखकाने संकलित केलेल्या गोव्याच्या कॅथलिक स्वातंत्र्यसैनिकांच्या अगदी संपूर्ण यादीमध्ये 200 हून अधिक (नोंदणीकृत असोत वा नसोत, परंतु गोव्याच्या अस्सल कॅथलिक राष्ट्रवाद्यांचा) जणांचा समावेश आहे.