मुंबई सिटीविरुद्ध आज नॉर्थईस्टची लढत

0
123

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बुधवारी येथील इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवर मुंबई सिटीविरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेडची लढत होत आहे. गुणतक्त्यात वरच्या भागात असलेले स्थान भक्कम करण्याचा नॉर्थइस्टचा प्रयत्न असेल.
नॉर्थईस्टने आपल्या मोसमाला धडाक्यात सुरुवात केली. अद्याप अपराजित असलेल्या तीन संघांमध्ये त्यांचा समावेश आहे. प्रशिक्षक रॉबर्ट जार्नी यांचा खेळाडूंच्या साथीत छान समन्वय जुळून आल्याचे दिसते. या क्लबने चार सामन्यांतून आठ गुण मिळविल्यामुळे तसे स्पष्ट दिसते.

क्रोएशियाच्या जार्नी यांना खास करून रेडीम ट्लांग याच्या फॉर्मचा आनंद वाटत असेल. त्याने दोन गोलांसह लक्षवेधी कामगिरी केली आहे. स्टार स्ट्रायकर असामोह ग्यान हा सुद्धा सज्ज झालेला असेल. आंतरराष्ट्रीय ब्रेकपूर्वी त्याला दुखापत झाली होती. बचाव फळीत जार्नी यांना थोडीशी चिंता आहे. काई हिरींग्ज याला एफसी गोवाविरुद्धच्या लढतीमधील मारामारीमुळे निलंबीत करण्यात आले आहे.

मुंबईचे बहुतांश जायबंदी खेळाडू तंदुरुस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा संघ आनंदात असेल. रॉलीन बोर्जेस, मोडोऊ सौगौ आणि मॅटो ग्रजिच संघात परतले असून विजय अनिवार्य असलेल्या लढतीपूर्वी प्रशिक्षक जोर्गे कोस्टा यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईचा संघ सध्या त्यांना परिचीत अशा स्थितीत आहे. त्यांनी बाहेरील दोन सामन्यांत चार गुणांसह सुरवात केली. त्यानंतर घरच्या मैदानावर त्यांना ओदीशा एफसी, तसेच एफसी गोवाविरुद्धही २-४ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.

गेल्या मोसमात चार सामने झाल्यानंतर त्यांचे गुण एवढेच होते. एफसी गोवाविरुद्धच्या दारूण पराभवातून ते सावरत होते. मग त्यांनी नऊ सामन्यांत अपराजित घोडदौड केली होती. त्यामुळे आता सुद्धा आपला संघ असाच प्रतिसाद देईल अशी आशा कोस्टा यांना असेल. आपली बचाव फळी सज्ज असेल याची दक्षता कोस्टा यांना घ्यावी लागेल. मागील दोन सामन्यांत त्यांच्याविरुद्ध प्रत्येकी चार गोल झाले आहेत.