रेफ्रीच्या दुर्लक्षाचा गोव्याला फटका

0
135

>> अपराजित घोडदौड खंडित

>> कॅस्टेलच्या गोलमुळे जमशेदपूर विजयी

रेफ्रीच्या दुर्लक्षाचा काल गोव्याला घरच्या मैदानावर जोरदार फटका बसला. त्यांची यंदाच्या हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात अपराजित मालिका घरच्या मैदानावर संपुष्टात आली. मंगळवारी जमशेदपूर एफसीने गोव्याला नेहरू स्टेडियमवर एकमेव गोलने हरविले. स्पेनचा २४ वर्षीय स्ट्रायकर सर्जिओ कॅस्टेल याने पूर्वार्धात केलेला गोल निर्णायक ठरला. पंरतु पहिल्या सत्राच्या अंतिम क्षणात गोव्याने नोंदविलेला गोल रेफ्रीच्या नजरचुकीमुळे दिला गेला नाही. अन्यथा सामना १-१ बरोबरीत संपला असता किंवा निकालही वेगळा लागू शकला असता.

सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या गोव्याला पाच लढतींत पहिलीच हार पत्करावी लागली. दोन विजय आणि दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे ८ गुण झाले. त्यांचा संघ चौथ्या क्रमांकावर गेला आहे. दुसरीकडे जमशेदपूरने पाच सामन्यांत तिसरा विजय मिळविला असून एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण झाले. त्यांनी पाचवरून तीन क्रमांक प्रगती करीत दुसरे स्थान गाठले. आघाडीवरील एटीकेप्रमाणेच जमशेदपूरचेही दहा गुण आहेत. यात एटीकेचा ७ (१०-३) गोलफरक जमशेदपूरच्या २ (७-५) पेक्षा सरस आहे. बेंगळुरू एफसी ९ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे.

गोव्याला स्पेनचा स्टार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याच्या गैरहजेरीत खेळावे लागले. सामन्यापूर्वी त्याला किरकोळ दुखापत झाली. त्याच्या अभावी गोव्याला भेदक चाली रचता आल्या नाहीत. दुसर्‍या सत्रात जॅकीचंद सिंग, सेरीटॉन फर्नांडीस, ब्रँडन फर्नांडीस यांना फिनिशिंग साधताना झगडावे लागले. यात जमशेदपूरचा अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याची कामगिरीही निर्णायक ठरली. त्यातच १८ मिनिटे बाकी असताना गोव्याचा एक खेळाडू कमी झाला. अहमद जाहौहला दुसर्‍या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले. त्यांच्या सुदैवाने जमशेदपूरचा आणखी गोल झाला नाही.

१७व्या मिनिटाला जमशेदपूरने सनसनाटी गोलसह खाते उघडले. बचाव फळीतील रॉबिन गुरुंगने नेहमीसारख्या खेळात आघाडी फळीतील फारुख चौधरीला पास दिला. फारुखने गोव्याच्या मंदार राव देसाई याच्या डोक्यावरून कॅस्टेलच्या दिशेने चेंडू मारला. आपल्याकडे चेंडू येताच कॅस्टेलने पहिल्याच प्रयत्नात मुर्तडा फॉलला चकविले आणि दुसर्‍या फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक महंमद नवाझ याचा बचाव भेदणारा अप्रतिम फटका मारला.

७२व्या मिनिटाला गोव्याच्या मध्य फळीतील अहमद जाहौहला मैदान सोडावे लागले. सामन्यातील पहिला कॉर्नर १५व्या मिनिटाला गोव्याला मिळाला. एदू बेदीयाने जवळच फटका मारला आणि चेंडू परत मिळविला. त्याचा प्रयत्न मात्र जमशेदपूरचा मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याने हेडींगवर थोपविला. त्यातून चेंडू आपल्यापाशी येताच गोव्याच्या अहमद जाहौहने ताकदवान फटका मारला, पण त्यात अचूकता नव्हती.

पहिल्या गोलनंतर जमशेदपूरला ३४व्या मिनिटाला आघाडी वाढविण्याची संधी मिळाली होती. फारुख चौधरी याने मध्य क्षेत्रातून आगेकूच करीत कॅस्टेलला पास दिला. कॅस्टेलने पेनल्टी क्षेत्रात मारलेला क्रॉस शॉट आपल्याकडे येताच सी. के. विनीतने प्रयत्न केला. त्यावेळी गोव्याचया सेरीटॉन फर्नांडीस याने त्याचा पाठलाग सुरु ठेवला. त्याच्या दडपणामुळे विनीत फिनिशींग साधू शकला नाही.

गोव्याला रेफ्रीच्या दुर्लक्षाचा फटका
पूर्वार्धाची दोन मिनिटे बाकी असताना जॅकीचंद सिंगला उजवीकडे चेंडू मिळताच गोव्याने चाल रचली. त्यातून बेदीयाने मेमो मौराला चकवून नेटच्या दिशेने हेडिंग केले. यावेळी चेंडूने गोलरेषा पार केल्याचे स्पष्ट दिसत होते. चेेंडू सुब्रतच्या पायाला लागून बाहेर आला. त्यावेळी सुब्रतचा पाय गोलरेषेपासून जवळ जवळ एक फूट आत होता. गोव्याच्या खेळाडूंनी रेफ्रीकडे अपील केल. परंतु त्याने ते फेटाळून लावले. अन्यथा गोव्याने पहिल्याच सत्रात १-१ अशी बरोबरी साधली असती आणि आपली अपराजित मालिकाही अखंडित राखली असती.