मुंबई व हैद्राबाद मार्गांवर कदंबची लवकरच वॉल्वो बससेवा

0
87

पुढील आठवड्यात ४ वॉल्वो बसेस ताफ्यात
कदंब महामंडळ लवकरच गोवा-मुंबई व गोवा-हैद्राबाद या मार्गांवर वॉल्वो बससेवा सुरू करणार असून गोवा-मुंबई मार्गावर दोन व गोवा-हैद्राबाद मार्गावर दोन अशी ही बससेवा असेल. यासाठी कदंब महामंडळ एकूण ४ वॉल्वो बसेस् खरेदी करणार असून पुढील आठवडाभरात महामंडळाला या बसेस् मिळणार आहेत, अशी माहिती कदंब महामंडळातील सूत्रांनी दिली. या बसेस् खरेदी करण्यासाठी गोवा सरकारने कदंब महामंडळाला चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.दरम्यान, गोवा-हैद्राबाद मार्गावर कदंब महामंडळ पहिल्यांदाच वॉल्वो बससेवा सुरू करणार आहे. कदंब महामंडळाच्या या मार्गावर आरामदायी बससेवा आहे. पण तिला म्हणावा तेवढा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत नाही. त्यामुळे या बसेस् सुरू मार्गावरून काढून त्या जागी वॉल्वो बससेवा सुरू करण्याचा महामंडळाने निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई मार्गावर कदंबची वॉल्वो बससेवा आहे. मात्र, कदंबने ती एका खासगी बस कंपनीला कंत्राटी पध्दतीवर चालवायला दिलेली आहे. खरेदी करण्यात येणार्‍या नव्या वॉल्वो बसेस् मात्र कदंब महामंडळ स्वत:च चालवणार असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.