मुंबई-गोवा महामार्गावरील 2 अपघातांत 12 ठार

0
9

मुंबई-गोवा महामार्गावर काल कणकवली-सिंधुदुर्ग आणि माणगाव-रायगड येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 12 जणांना आपला जीव गमवावा लागला. कणकवलीत आराम बस उलटल्याने दोघे ठार झाले, तर माणगाव येथे ट्रक आणि इको कारमध्ये झालेल्या अपघातात 9 जण ठार झाले.

सविस्तर माहितीनुसार, पुण्याहून गोव्याकडे जाणारी सदर आराम बस गुरुवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हळवल फाटा, कणकवली येथे आली असता चालकाचा ताबा सुटून ती पलटी झाली. त्यात दोघाजणांचा मृत्यू झाला. या बसमध्ये एकूण 37 प्रवासी होते. या अपघातात अन्य 30 जण जखमी झाले असून, दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालय व खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

या अपघातात शैलजा प्रेमानंद माजी (57, रा. दोडामार्ग) व अण्णा गोविंद नाले (52, रा. सातारा) यांचा मृत्यू झाला. या अपघाताची खबर मिळताच स्थानिक नागरिक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लागलीच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव-रायगड येथे ट्रक आणि इको कार यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 5 वर्षीय मुलाचा माणगाव येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृतांमध्ये 4 महिला आणि 5 पुरुषांचा आणि एका बालकाचा समावेश आहे. माणगाव येथे पहाटे पाचच्या सुमारास ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या इको कारला धडकला. त्यात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.