मुंबई इंडियन्सचा ‘सूर्य’ तळपला

0
83

>> राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी बहारदार विजय

सूर्यकुमार यादव याच्या ४७ चेंडूंतील नाबाद ७९ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने काल मंगळवारी राजस्थान रॉयल्सचा ५७ धावांनी पराभव केला. इंडियन प्रीमियर लीग मोसमातील या विसाव्या सामन्यात मुंबईच्या ४ बाद १९३ धावांना उत्तर देताना राजस्थानचा डाव बुमराह व सहकार्‍यांच्या भेदक गोलंदाजीसमोर १८.१ षटकांत १३६ धावांत संपला.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने मागील सामन्यात खेळलेला संघच या सामन्यासाठी कायम ठेवला तर राजस्थानने कार्तिक त्यागी, अंकित राजपूत व यशस्वी जैसवाल यांना संधी देत रॉबिन उथप्पा, रियान पराग व जयदेव उनाडकट यांना बाहेरचा रस्ता दाखवला. क्विंटन डी कॉक व रोहित शर्मा यांनी मुंबईला ४९ धावांची सलामी दिली. पदार्पणवीर कार्तिक त्यागीने डी कॉकला तंबूत पाठवले. त्यागीचा चेंडू ‘हूक’ करण्याच्या नादात डी कॉक यष्टिरक्षक बटलरकरवी झेलबाद झाला. कर्णधार रोहित चांगल्या लयीत दिसत होता. अर्धशतक करण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू असताना रोहित मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर बाद झाला. एका टोकाने सूर्यकुमार फटकेबाजी करत असताना दुसर्‍या बाजूने किशन (०) बाद झाला. पाचव्या स्थानी बढती मिळालेला कृणाल पंड्यादेखील अपयशी ठरला. १७ चेंडू खेळून केवळ १२ धावा करत त्याने संघावरील दबावात भर टाकली. हार्दिक पंड्याने यानंतर १९ चेंडूंत नाबाद ३० धावा जमवत संघाला १९३ धावांपर्यंत मजल मारून दिली.

धावांचा पाठलाग मुंबईने सुरुवातीलाच राजस्थानला धक्के दिले. बुमराहने यंदाच्या आयपीएल मोसमात प्रथमच नव्या चेंडूने गोलंदाजी करत कर्णधार स्टीव स्मिथ याचा काटा काढला. त्याचा सहकारी ट्रेंट बोल्टने जैसवाल (०) व संजू सॅमसन (०) यांना भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे राजस्थानची ३ बाद १२ अशी केविलवाणी स्थिती झाली. सलामीवीर बटलर याने ४४ चेंडूंत ७० धावा चोपल्याने राजस्थानला शतकी वेस ओलांडता आली. जोफ्रा आर्चरने तळाला फटकेबाजी करत पराभवाचे अंतर कमी केले. बुमराहने पुन्हा फॉर्ममध्ये येत ४ बळी घेतले. आपल्या चार षटकांत त्याने तब्बल १४ निर्धाव चेंडू टाकले.

धावफलक
मुंबई इंडियन्स ः क्विंटन डी कॉक झे. बटलर गो. त्यागी २३, रोहित शर्मा झे. तेवतिया गो. गोपाळ ३५, सूर्यकुमार यादव नाबाद ७९ (४७ चेंडू, ११ चौकार, २ षटकार), ईशान किशन झे. सॅमसन गो. गोपाळ ०, कृणाल पंड्या झे. गोपाळ गो. आर्चर १२, हार्दिक पंड्या नाबाद ३०, अवांतर १४, एकूण २० षटकांत ४ बाद १९३

गोलंदाजी ः अंकित राजपूत ३-०-४२-०, श्रेयस गोपाळ ४-०-२८-२, जोफ्रा आर्चर ४-०-३४-१, कार्तिक त्यागी ४-०-३६-१, टॉम करन ३-०-३३-०, राहुल तेवतिया २-०-१३-०
राजस्थान रॉयल्स ः यशस्वी जैसवाल झे. डी कॉक गो. बोल्ट ०, जोस बटलर झे. पोलार्ड गो. पॅटिन्सन ७० (४४ चेंडू, ४ चौकार, ५ षटकार), स्टीव स्मिथ झे. डी कॉक गो. बुमराह ६, संजू सॅमसन झे. शर्मा गो. बोल्ट ०, महिपाल लोमरोर झे. अनुकूल गो. चहर ११, टॉम करन झे. हार्दिक गो. पोलार्ड १५, राहुल तेवतिया त्रि. गो. बुमराह ५, जोफ्रा आर्चर झे. पोलार्ड गो. बुमराह २४, श्रेयस गोपाळ झे. डी कॉक गो. बुमराह १, अंकित राजपूत झे. शर्मा गो. पॅटिन्सन २, कार्तिक त्यागी नाबाद ०, अवांतर २, एकूण १८.१ षटकांत सर्वबाद १३६
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-०-२६-२, जसप्रीत बुमराह ४-०-२०-४, जेम्स पॅटिन्सन ३.१-०-१९-२, राहुल चहर ३-०-२४-१, कृणाल पंड्या २-०-२२-०, कायरन पोलार्ड २-०-२४-१