मुंबईचे आव्हान कायम

0
99

>> किंग्स इलेव्हन पंजाबवर ६ गडी व ६ चेंडू राखून विशाल विजय

इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील आपले आव्हान टिकवून ठेवताना मुंबई इंडियन्सने काल शुक्रवारी किंग्स इलेव्हन पंजाबवर ६ गडी व ६ चेंडू राखून मोठा विजय संपादन केले. किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ठेवलेले १७५ धावांचे लक्ष्य मुंबईने १९ षटकांत गाठले. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीनंतर हार्दिक (१३ चेंडूंत २३) व कृणाल (१२ चेंडूंत नाबाद ३१) यांनी कर्णधार रोहित शर्मा (१५ चेंडूंत नाबाद २४) याच्या साथीने मुंबईला विजयी केले.
पंजाबवर मिळविलेल्या विजयासह मुंबईने गुणतालिकेत आठव्या स्थानावरून थेट पाचवे स्थान मिळविले आहे. ९ सामन्यांतून ३ विजय व ६ पराभव नावावर असलेल्या मुंबईची निव्वळ धावगती (०.००५), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली डेअरडेव्हिल्स व राजस्थान रॉयल्सपेक्षा जास्त आहे.

तत्पूर्वी, जबरदस्त फॉर्मात असलेल्या ख्रिस गेल- लोकेश राहुल जोडीने पंजाबच्या डावाची धडाकेबाज सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी रचली. मयंक मार्कंडेने राहुलला २४ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
राहुल बाद झाल्यानंतरही गेलचा धडाका सुरुच होता. गेलने २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. अर्धशतक झळकवल्यानंतर गेल फार टिकला नाही. तो ५० धावांवर बेन कटिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. युवराज सिंगने कृणाल पंड्याला षटकार खेचत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या नादात तो वैयक्तित १४ धावांवर धावबाद झाला.

करुण नायर आणि अक्षर पटेलला योग्यवेळी बाद करत मुंबईने पंजाबच्या धावसंख्येला ब्रेक लावला. मात्र हार्दिक पंड्याने टाकलेल्या शेवटच्या षटकामध्ये पंजाबने २२ धावा काढत किंग्ज इलेव्हन पंजाबला धावांपर्यंत ७ बाद १७४ पर्यंत मजल मारता आली. मुंबईचे क्षेत्ररक्षण त्यांच्या लौकिकाला साजेसे झाले नाही. पंजाबच्या खेळाडूंना धावबाद करण्याच्या किमान चार संधी त्यांनी दवडल्या.
पंजाबने या सामन्यासाठी तीन बदल करताना सरन, तिवारी व फिंच यांना बाहेर बसवून अक्षर, युवराज व स्टोईनिस यांना उतरवले.
आज चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर तसेच सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात सामने होणार आहेत.

धावफलक
किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल झे. ड्युमिनी गो. मार्कंडे २४, ख्रिस गेल झे. यादव गो. कटिंग ५०, युवराज सिंग धावबाद १४, करुण नायर झे. हार्दिक गो. मॅकलेनाघन २३, अक्षर पटेल झे. हार्दिक गो. बुमराह १३, मार्कुस स्टोईनिस नाबाद २९, मयंक अगरवाल झे. कृणाल गो. हार्दिक ११, रविचंद्रन अश्‍विन नाबाद ०, अवांतर १०, एकूण २० षटकांत ६ बाद १७४
गोलंदाजी ः मिचेल मॅकलेनाघन ४-०-३१-१, जसप्रीत बुमराह ४-०-१९-१, हार्दिक पंड्या ४-०-४४-१, मयंक मार्कंडे ३-०-२९-१, जेपी ड्युमिनी १-०-८-०, बेन कटिंग ३-०-२८-१, कृणाल पंड्या १-०-१०-०
मुंबई इंडियन्स ः सूर्यकुमार यादव झे. राहुल गो. स्टोईनिस ५७, इविन लुईस झे. राहुल गो. मुजीब १०, इशान किशन त्रि. गो. मुजीब २५, हार्दिक पंड्या त्रि. गो. टाय २३, रोहित शर्मा नाबाद २४, कृणाल पंड्या नाबाद ३१, अवांतर ६, एकूण १९ षटकांत ४ बाद १७६
गोलंदाजी ः रविचंद्रन अश्‍विन ४-०-२३-०, अंकित राजपूत ३-०-३१-०, अँडी टाय ४-०-३५-१, मुजीब उर रहमान ४-०-३७-२, अक्षर पटेल १-०-९-०, मार्कुस स्टोईनिस ३-०-३७-१