मुंगी ः एक किमयागार

0
290
  • अंजली आमोणकर

नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा वस्तुपाठ आहे; संघवृत्ती आदर्श आहे. मुंगीची जीवननिष्ठा, भविष्य निर्वाह पर्याय, शिस्त, कष्ट अशी अनेक जीवनावश्यक मूल्यं मानवाची प्रेरक बनतात.

‘मुंगी’ हा कीटकवर्गाच्या, ‘फार्मिसिडी’ या कुळातील प्राणी आहे. विश्वाचा एक अद्भुत प्राणी म्हणजे मुंगी! मानवासाठी उद्बोधक. मुंगीरूपी जीवात्मा या जगात कसं असावं आणि कसं जगावं ते शिकवतो. मुंगीसारख्या अतिसामान्य वाटणार्‍या कीटकाची जीवनशैली पाहिल्यावर बुद्धिजीवी मानवाचा अभिमान गळून पडेल यात शंका नाही. स्वतःमध्ये अफाट सामर्थ्य घेऊन मुंगी जीवन क्रमण करते. कणभराएवढा हा छोटा कीटक, पण आपला प्रचंड मोठा शिक्षक म्हणावे लागेल त्याला. मुंगीमध्ये शिकण्याची आणि शिकवण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे.
अतिशय शूरपणे आणि उच्च बौद्धिक पातळीवर मुंगी जगते. मुंगी कोणाच्या अध्यात-मध्यात नसते. ‘आपण भले, आपले काम भले’- हे मुंगीचं तत्त्वज्ञान! आज दोन माणसांना, शेजार्‍यांना, गटांना, प्रांतांना किंवा देशांनासुद्धा इतरांचं कसं आणि काय चालू आहे यात जास्त रस असतो. पण मुंगी मात्र स्वतःच्या आयुष्यात मग्न असते. कष्टकरी, अतिशय शिस्तबद्ध असं मुंगीचं जीवन! एका ओळीत, एका मागोमाग, तुरू-तुरू, लगबगीने चालणार्‍या मुंग्यांची रांग आपण बघतोच. त्यांच्यात कुठे अहंकार आढळतो? प्रत्येक सामोर्‍या येणार्‍या मुंगीशी एक क्षणभर थांबून, भेट-गाठ घेऊन मगच पुढचा मार्ग क्रमताना त्या दिसतात. माणसाला मात्र ओळखीच्या व्यक्तीकडे बघून स्मित करताना जड जाते. शिष्टपणा माणसाच्या मनात आहे; मुंग्यांच्या नाही. दिवसाचा जास्तीत जास्त वेळ मुंग्या कामात घालवतात, नेमून दिलेलं काम न कुरकुरता जबाबदारीने करतात. त्यांच्याकडेही कामांची वाटणी केलेली आढळते. शेतकरी वर्ग, संरक्षक दल, कामकरी मंडळ आणि प्रजननासाठी राणी मुंगी- अशी नियोजनबद्धता असते. आरोप-प्रत्यारोप नाही; दिलेल्या कामात कामचुकारपणाही नाही. कोणत्याही कामाची कार्यप्रणाली त्यांच्यातल्या बुजुर्ग मुंगीकडून शिकतात. वयोवृद्धांची आणि राणीमुंगीने दिलेल्या अंड्यांची हिफाजत प्राणपणाने करतात. बुद्धिजीवी मानवाच्या जगात मात्र वृद्धाश्रम आणि पाळणाघरांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे… हा चिंतेचा विषय आहे.

एकत्र आणि एकाच वारुळात राहण्यात त्या धन्यता मानतात. त्यांच्या घराप्रति म्हणजेच वारुळाप्रति त्यांची निष्ठा प्रचंड असते. अतिशय सुबक, नीटनेटकं, स्वच्छता राखलेलं असं त्यांचं वारुळ असतं. त्यांना मुद्दाम वेगळे ‘स्वच्छता अभियान’ राबवण्याची गरज पडत नाही. स्वच्छता त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मुंगीसारख्या छोट्या कीटकाला जे उमगलं, आकलन झालंय ते श्रेष्ठ मानवाला मात्र कळायला जड जातंय. मातीपासून वारुळ आणि पानांपासून घर बनवताना पारंपरिक वास्तुकलेचा वारसा मुंगीपाशी आहे. निरुपद्रवी फुलपाखरांना, कीटकांना मुंग्या आपल्या वारुळात आसरा देऊन राहण्याची परवानगी देतात. त्याचा मोबदला म्हणून त्यांच्याकडून सुवास, मध, परागकण घेतात. अतिशय सामंजस्यानं ही देवाण-घेवाण चालते. पण जरा जरी अतिक्रमणाची चाहूल लागली तरी त्याच ठिकाणी, त्याच वेळी आसरा दिलेल्या कीटकाचा खातमाही करतात. त्या क्रियेत विचारांची दुफळी नसते. जन्मजात असलेली ही संघवृत्ती, राष्ट्रवृत्ती, एकोपा त्या आपल्याला शिकवतात.

संत ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाचं वर्णन करताना एक ‘पिपिलिका मार्ग’ सांगितला आहे. ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी’ हे उद्गार सर्वपरिचित आहेतच. संत तुकारामांनी तर मुंगीप्रमाणे लहान, विनम्र व्हा.. हा संदेश ‘लहानपण दे गा देवा, मुंगीसाखरेचा रवा…’ या अभंगातून दिलेला आहे. मुंगीपुढे माणसाचं जीवन किती सामान्य आहे, हे बा. सी. मर्ढेकर यांच्या लिखाणातून सांगतात. तत्त्वज्ञानात आणि अध्यात्मात तर मुंगीचा दाखला अनेकांनी दिलेला आहे. श्रीचक्रधर स्वामींनी महानुभावासाठी सांगितलेल्या आचारसंहितेत मुंगीसारखे व्हायला सांगितले आहे.

विविध उपदेश, तत्त्वविचार सांगण्यासाठी आणि मानवी प्रवृत्ती वर्णन करण्यासाठी मुंगीचे जरी प्रतीक वापरले असले तरी प्रत्यक्षात ती अफाट क्षमतेनं काम करतच असते. तिचं आश्चर्यचकित करणार्‍या गोष्टींनी समृद्ध असलेलं जीवन मानवासाठी उद्बोधकच आहे. आज माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही मुंगी आपल्याला मार्गदर्शन करते. वाहतूक व्यवस्थापन, दिशा-दर्शनाचं कार्य, संघटन, एकत्रीकरण, सहयोग, मार्गदर्शक बनणे, सहजीवन व्यतीत करणे ही सामाजिकतेच्या संदर्भातली काही लक्षणं सांगता येतील. मुंगी समाजप्रियता सुचवते. नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी असं सांगतात. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा वस्तुपाठ आहे; संघवृत्ती आदर्श आहे. मुंगीची जीवननिष्ठा, भविष्य निर्वाह पर्याय, शिस्त, कष्ट अशी अनेक जीवनावश्यक मूल्यं मानवाची प्रेरक बनतात.