‘मिशन पॉलिटिकल’ संघटना निवडणुकीत तटस्थ राहणार

0
19

>> संघटनेचे अध्यक्ष जुवांव फर्नांडिस यांची माहिती

>> मताबाबतचा व्यक्तिशः निर्णय घेण्याचे आवाहन

राज्यातील अनुसूचित जमातींतील लोकांना राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर एसटी ऑफ गोवा’ या संघटनेने आगामी लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणार आहे. संघटनेने या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला आपले समर्थन न देण्याचा तसेच तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष ॲड. जुवांव फर्नांडिस यांनी काल येथे घेतलेले पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, यासंबंधी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ॲड. फर्नांडिस यांनी, लोकसभा निवडणुकीसंबंधीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघ निश्चित करण्यासाठी मतदारसंघ फेररचना आयोगाची स्थापना केली जावी, अशी आमची मागणी होती. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने राज्यातील एसटी बांधव नाराज असल्याचे स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर 2024 साली होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात यावा, असे आवाहन आम्ही एसटी बांधवांना केले होते. मात्र, आता आमच्या भूमिकेत आम्ही थोडा बदल केला असून संघटनेने याबाबत तटस्थ रहावे व एसटी बांधवांनी कुणाला मत द्यावे त्याचा निर्णय व्यक्तिश: त्यांनी घ्यावा, असे आम्ही कळवले आहे, असे ॲड. फर्नांडिस यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. केंद्रात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर संघटना आरक्षणासाठीचा आपला मुद्दा नव्या सरकार समोर ठेवील, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

संघटनेने सचिव रुपेश वेळीप, रामा काणकोणकर, सोयरु वेळीप व डॉ. सत्यवान गांवकर यांनी वैयक्तिक कारणांसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहितीही ॲड. फर्नांडिस यांनी यावेळी दिली.
कालपर्यंत संघटना आपण सत्ताधारी भाजपविरोधात काम करणार असे सांगत होता. पण आता अचानकपणे संघटनेने आपली भूमिका का बदलली असा प्रश्न पत्रकारांनी केला असता ॲड. जुवांव फर्नांडिस व अन्य पदाधिकारी योग्य असे उत्तर देऊ शकले नाहीत.
‘मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर एसटी ऑफ गोवा’ ह्या संघटनेतील काही नेते अन्य पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत होते. गोवा विधानसभेवर मोर्चा नेण्याचा निर्णय हा आम्हाला व अन्य काही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच घेण्यात आला होता. तसेच जेव्हा प्रत्यक्ष मोर्चा काढण्यात आला तेव्हा मोर्चात मनोज परब यांच्या रेव्हुलेशनरी गोवन्स पक्षाला सहभागी करून घेऊन मोर्चाची सगळी सूत्रे ह्या पक्षाच्या हवाली करण्यात आली. आमच्यासाठी ही अनपेक्षित अशी घटना होती, असे वरील संघटनेच्या सचिवपदाचा राजीनामा दिलेले नेते रुपेश वेळीप व केपे मतदारसंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन संघटनेतून बाहेर पडलेले नेते सोयरू वेळीप यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. संघटनेने घेतलेले अन्य काही निर्णयही त्यांना मान्य नसल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासंबंधी बोलणे ह्या नेत्यांनी टाळले.

अनेक जणांचे राजीनामे
सदर संघटनेने आपली भूमिका बदलल्याने या संघटनेत फूट पडली असून संघटनेचे सचिव रुपेश वेळीप, तसेच रामा काणकोणकर, सोयरू वेळीप व डॉ. सत्यवान गांवकर या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला असून ते संघटनेतून बाहेर पडले आहेत.