तोपर्यंत टाकीसंबंधीचे काम बंद ठेवण्याची मागणी; आंदोलकांना पाठिंबा
मिराबाग, सावर्डे येथील जलसिंचनासाठीच्या टाकीसंबंधीची खरी व इत्यंभूत माहिती जोपर्यंत स्थानिक लोकांना देण्यात येत नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवण्याची मागणी काल काँग्रेस पक्षाने केले. स्थानिक लोकांनी वरील मागणीसाठी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करीत व या आंदोलनात सहभागी होत काल गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी वरील मागणी केली.
काल या धरणे आंदोलनात सहभागी झाल्यानंतर बोलताना अमित पाटकर यांनी, मिराबाग, पंचवाडी येथील जलसिंचनासाठीच्या या टाकीसंबंधीची चुकीची माहिती लोकांना देण्यात येत असल्याने समस्या निर्माण झालेली आहे. या टाकीसाठी जेव्हा निविदा काढण्यात आली होती तेव्हा ही टाकी 30 एमएलडी एवढ्या क्षमतेची असल्याने निविदेतून नमूद करण्यात आले होते. मात्र, 2 डिसेंबर 2023 रोजी जेव्हा या पाण्याच्या टाकीसाठी निविदा काढण्यात आली तेव्हा 50 एमएलडीसाठी प्रशासकीय मान्यता घेऊन घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, आता सार्वजनिक सुनावणीसाठीच्या नोटीसीत टाकीची क्षमता 60 एमएलडी असल्याचे नमूद करण्यात आले असल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे.
टाकीच्या पाण्याच्या क्षमतेसंबंधी दरवेळी वेगळी माहिती देण्यात येत असून त्यामुळे भाजप सरकारचे यामागे काहीतरी छुपे कारस्थान असावे असा आरोप पाटकर यांनी केला.
पुन्हा पुन्हा या पाण्याच्या टाकीची क्षमता का वाढवण्यात येत आहे आणि कुणाच्या फायद्यासाठी हे केले जात आहे. या टाकीची अंतिम रचना कशी असेल व या प्रकल्पाचा केवढा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना मिळणार आहे हे सगळे तपशील सरकारने द्यायला हवेत, अशी मागणीही पाटकर यांनी केली आहे.
भाजपचे डबल इंजिन सरकार सत्तेवर असताना व सावर्डे मतदारसंघात भाजपचा आमदार असताना भाजप सरकार स्थानिक लोकांच्या भावनांशी का खेळत आहे, असा प्रश्नही पाटकर यांनी केला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल जनतेपुढे ठेवला जावा, अशी मागणीही पाटकर यांनी केली आहे.