मिरचीचे ‘गोड’ लोणचे

0
641
  •  प्रज्वलिता गाडगीळ

लोणच्याची जागा आणखी कुठलीच गोष्ट घेऊ शकत नाही. आंबट, तिखट, चमचमीत, कडू, तोंडाला पटकन् पाणी सुटेल असा पदार्थ म्हणजे लोणचं. आजारी माणसांना, ज्यांच्या तोंडाची चव गेलीय, त्यांना पुन्हा चव येण्यासाठी एक छोटीशी लोणच्याची फोड पुरे असते.

काय आश्‍चर्य वाटले ना मिरचीचे आणि गोड लोणचे ऐकून.. की.. तोंडाला पाणी सुटले? अहो, खरंच आज मी तुम्हाला मिरचीचे गोड लोणचे कसे करायचे ते सांगते.

जेवण म्हटले म्हणजे डोळ्यासमोर सजवलेले ताट येते, मग ते घरी असो, हॉटेलमध्ये असो किंवा कोणत्याही संमारंभात असो. जेवणाच्या ताटात लोणचे हे असतेच असते. लोणच्यासाठी जेवणाच्या ताटात राखीव जागा असतेच. लोणच्यामुळे जेवणात वेगळीच मजा असते मग ते कसलेही का असेना! हल्ली तर सगळ्याच प्रकारची लोणची केली जातात. बाकी काहीही म्हणा, लोणचं ते लोणचं.

आधी ठराविक प्रकारचीच लोणची केली जात. लिंबू, कैरी, आवळा या सगळ्यांचे सीझन संपले की किमान खारवलेल्या कैरीचं लोणचं करायचे. एखादेवेळी वरण-भात, ताक-भात, कढी-भात, आसट (मऊ भात) भातासोबत भाजी- लोणच्याची फोड, बस्स, एवढेच प्रकार असायचे. सणावारांना तेवढं गोड-धोड. पण आता तसं नाही बरं! आता मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा ताट कसं भरलेलं हवं असतं… आमटी- भाजी- भात- पोळी- कोशिंबीर- पापड असला तरी लोणचं हे हवंच. शिरा, उप्पीठ, पोहे, पोळी, खिचडी जरी असली तरी लोणचं लागतंच. कारण बाराही महिने या ना त्या प्रकारचं लोणचं सगळ्यांच्या घरी असतं.

आताच्या युगात सगळ्या प्रकारच्या लोणच्यांना खप असतो, मग ते वांग्याचं, मुळ्याचं, करवंदाचं (कच्ची), फणसाचं, आंबाड्याचं, सुरणाचं, फुलगोबीचं, कांद्याचं, ओल्या हळदीचं, गाजराचं इतकंच नव्हे तर कारल्याचंसुद्धा लोणचं करतात. नवीन आहे ना? ज्यांनी खाल्लं ते सांगतात, वांग्याचं लोणचं किती छान लागतं माहीत आहे? कारल्याचं तर त्यापेक्षाही छान लागतं. कारलं कडू असलं म्हणून काय झालं? वा लोणचं खावं तर कारल्याचंच. असे उद्गार ऐकायला मिळतात. कारण शेवटी लोणचं ते लोणचंच!

लोणच्याची जागा आणखी कुठलीच गोष्ट घेऊ शकत नाही. आंबट, तिखट, चमचमीत, कडू, तोंडाला पटकन् पाणी सुटेल असा पदार्थ म्हणजे लोणचं. आजारी माणसांना, ज्यांच्या तोंडाची चव गेलीय, त्यांना पुन्हा चव येण्यासाठी एक छोटीशी लोणच्याची फोड पुरे असते. मानायला हवंय बुवा लोणच्याला!!
आतापर्यंत बर्‍याच प्रकारची लोणची खाल्लीत, पण मिरचीपासून बनवलेलं गोड लोणचं क्वचितच खाल्लंय. मला नवीन नवीन शिकून घ्यायला व ते करून बघायला व दुसर्‍याला खायला घालायला फार आवडतं. खूप आधी माझ्या आईने हे लोणचं केलं होतं व तेसुद्धा माझ्या पुढ्यात. तुम्हीपण नक्कीच करून बघाल याची खात्री आहे. चला तर शिकू या मिरचीचे गोड लोणचे!
अर्धाकिलो हिरव्या मिरच्या घेऊन स्वच्छ धुवून व पुसून घ्या. पाव किलो किसलेला गुळ, एक वाटी चिंचेचा कोळ (भिजवलेल्या चिंचेचं जाडसर पाणी), पाव वाटी पांढरे तीळ, दीड वाटी गोडे तेल, चार ते पाच चमचे (छोटे) मीठ, हळद पावडर नसल्यास हळकंडाचे दोन तुकडे बारीक, खडा हिंग, पाव चमचा मेथी, अर्धी वाटी मोहरी.

कृती ः देठासकट मिरची घेऊन मिरचीला वरून देठापर्यंत छेद द्या. कढईत तेल तापत ठेवून सर्वप्रथम त्यात मिरच्या घालून मिरच्यांना पांढरा रंग येईपर्यंत तळून घ्या, मिरची भाजायला पाच ते सात मिनिटे लागतील. चमचाभर तेलात हिंग व मेथी खमंग भाजून घ्या. हळदीचे तुकडे असले तर तेपण जरा तळून (परतून) घ्या. मिक्सरच्या भांड्यात कच्ची मोहरी (हिरवी), हिंग, मेथी व हळदीचे तुकडे घालून बारीक पावडर करा. मिरच्या भाजून घेतलेल्या तेलात सगळ्यात आधी पांढरे तीळ घाला व ते फुलल्यावर त्यात चमचाभर मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर लगेचच त्यात चिंचेचा कोळ, किसलेला गुळ, मीठ घाला. मिश्रण उकळल्यावर (दाट पाक झाल्यावर) त्यात वाटलेली मोहरी पावडर घाला. दोन मिनिटांनी त्यात तळून घेतलेल्या मिरच्या घालून नीट ढवळा व गॅस बारीक करून मंद आचेवर शिजू द्या. असे केल्याने शिजतेवेळी सगळा मसाला मिरचीत पूर्ण भरला जाईल. थोडावेळ झाकण ठेवा.

हे आंबट-गोड-तिखट लोणचे तुम्ही लगेच पण खाऊ शकता. दहा-पंधरा दिवस हे लोणचे टिकते. पोळी, ब्रेड, भाकरीलापण हे लोणचे छान लागते. आधीपासून मसाला करून ठेवलात तर हे लोणचे अर्ध्या तासात तयार होते.