मिझोरमच्या मुख्यमंत्रिपदी लालदुहोमा शपथबद्ध

0
2

मिझोरममधील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) नेते लालदुहोमा हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. लालदुहोमा यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता आयझॉल येथील राजभवनात राज्यपाल हरी बाबू कंभमपती यांच्यासमोर मिझोरमच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय झेडपीएमच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मिझोरम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केलेल्या लालदुहोमा यांनी 1977 साली गोवा पोलीस खात्यात अधीक्षकपदी काम केले होते.
मिझोरममधील 40 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत झेडपीएमने 27 जागा जिंकल्या होत्या. बुधवारी राज्यपालांची भेट लालदुहोमा यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर काल राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. के. सपडांगा, वनलालहलाना, सी. लालसाविवुंगा, ललथनसांगा, वनलालथलाना, पी. सी. वनलालरुआता आणि लालरिनपुई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. लालरिनपुई या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री आहेत. एफ. रोडिंगलियाना, बी. लालचनजोवा, लालनिलवामा आणि लालनघिंगलोवा यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.