>> माहिती आयुक्तांचे आवाहन
माहिती हक्क कायद्याखाली मिळणार्या माहितीचा वापर जनतेच्या हितार्थ करावा, असे आवाहन राज्य माहिती आयुक्त प्रतिमा वेर्णेकर यांनी येथे काल केले. गोवा आरटीआय फोरमने मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात वेर्णेकर बोलत होत्या.
सरकारच्या काही खात्यांमध्ये पूर्णवेळ अधिकारी नसल्याने माहिती हक्क कायद्याखाली माहिती देण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे, असेही वेर्णेकर यांनी नमूद केले. माहिती हक्क कायद्यामुळे नोकरशहाच्या मानसिकतेमध्ये बदल होत आहे. तसेच व्यवहारात पारदर्शकता येण्यास सुरुवात झाली आहे. आरटीआयच्या जनजागृतीसाठी सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था आणि प्रसारमाध्यमांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही वेर्णेकर यांनी सांगितले.
माहिती हक्क कायद्याचा वापर करून जास्तीत जास्त बातम्या प्रसिद्ध करणार्या मिडिया हाउसला २५ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण पुढील वर्षीपासून केले जाणार आहे, अशी घोषणा आयटीआय फोरमचे अध्यक्ष दिगंबर नाईक यांनी यावेळी केली.
माहिती हक्क कायद्याखालील माहितीचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर माहिती हक्क कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे, असे प्रकाश कामत यांनी सांगितले.
फोरमचा वामन ऊर्फ म्हाबळू कामत स्मृती ऍक्टिविस्ट ऑफ द इयर पुरस्कार ज्युडीथ आल्मेदा आणि जवाहरलाल शेट्ये यांना विभागून देण्यात आला. फोरमच्या विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.