>> श्रीलंकेविरुद्धचा तिसरा टी-ट्वेंटी सामना आज
भारत व श्रीलंका यांच्यातील तिसरा व शेवटचा टी-ट्वेंटी सामना आज शुक्रवारी खेळविण्यात येणार आहे. मालिका अजून आपल्या नावावर केली नसल्यामुळे टीम इंडिया संघात ‘प्रयोग’ करण्याची शक्यता फार कमी आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे अखेरचा सामना जिंकून टीम इंडिया मालिका आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाली असून दुसरीकडे लंकेचा संघ मालिका १-१ अशी बरोबरी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला थेट प्रवेेश मिळालेला नाही. पात्रता फेरीच्या मार्गे त्यांना मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवाला लागणार आहे. त्यामुळे संघाचा समतोल, खेळाडूंची भूमिका याविषयी लवकरात लवकर त्यांना निर्णय घ्यावे लागणार आहेत. अष्टपैलू इसुरु उदानाच्या दुखापतीमुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. उदानाच्या जागी अँजेलो मॅथ्यूजचा संघात समावेश अपेक्षित आहे. मॅथ्यूजने सामन्याच्या पूर्वसंध्येला नेट्समध्ये गोलंदाजीचा सरावही केला. त्यामुळे त्याच्याकडून नव्या चेंडूने एक-दोन षटकांचा उपयोग झाल्यास कर्णधार मलिंगा स्वतःची षटके डेथ ओव्हर्ससाठी राखू शकतो. लेगस्पिनर वानिंदू हसारंगा याने पहिल्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली होती. परंतु, सलग दुसर्या सामन्यात या कामगिरीची पुनरावृत्ती त्याच्याकडून अपेक्षित नाही. त्यामुळे कुमारा व मलिंगा या प्रमुख गोलंदाजांना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. धनंजय डीसिल्वा व दासुन शनका यांना आपले अष्टपैलूत्व सिद्ध करावे लागणार आहे. फलंदाजी विभागात यष्टिरक्षक फलंदाज कुशल परेराने दुसर्या सामन्यात थोडीफार चमक दाखवली. परंतु, इतरांना नवदीप सैनीच्या वेगासमोर चाचपडावे लागले. काही फलंदाजांनी फटक्यांची केलेली चुकीची निवडदेखील संघाला भोवली. त्यामुळे आज धावांचा पाठलाग करताना किंवा प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला फटक्यांच्या निवडीबाबत सजग राहावे लागेल. दुसरीकडे टीम इंडियासमोर चिंतेचे कारण नाही. मालिकेचा निकाल अजून लागलेला नसल्याने तसेच मागील दोन टी-ट्वेंटी मालिकांमध्ये प्रत्येकी एक पराभव पत्करावा लागलेला असल्यामुळे टीम इंडिया संघात घाऊक बदल करणे अपेक्षित नाही. विराटने चहलला संधी द्यायची ठरविल्यास कुलदीप यादवला आपली जागा रिकामी करावी लागणार आहे. बुमराहला पुनरागमनाच्या सामन्यात आपली लय गवसली नव्हती. सैनी व शार्दुल हे तुलनेने नवखे गोलंदाज या लढतीत भाव खावून गेले होते. त्यामुळे बुमराहला आपला अनुभव आणण्याचा दबाव आज नक्की जाणवणार आहे. फलंदाजीचा विचार केल्यास कोहलीने श्रेयसला तिसर्या स्थानावर पाठवले होते. आजच्या सामन्यात दुबे किंवा पंतला आपल्या पुढे फलंदाजीस पाठवून त्यांना फलंदाजीची पुरेशी संधी कोहली देऊ शकतो. त्यामुळे क्रमवारीतील बदल संभव आहेत. पुणेच्या मैदानावर झालेल्या यापूर्वीच्या अखेरच्या लढतीत श्रीलंकेने भारताला १०१ धावांत गुंडाळले होते. त्यामुळे पाहुण्यांसाठी हे मैदान ‘लकी’ठरले होते. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.