जमशेदपूरला पराभूत करीत बेंगळुरू एफसीची आगेकूच

0
112

एरिक पार्टालू आणि सुनील छेत्री यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर बेंगळुरू एफसी संघाने जमशेदपूर एफसी संघाचा २-० असा पराभव करीत हिरो इंडियन सुपर लीगगमध्ये (आयएसएल) काल गुरुवारी येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर शानदार विजयांसह पूर्ण गुणांची कमाई केली. बेंगळुरूचा हा सलग दुसरा विजय असून त्यांनी गुणतक्त्यात दुसरे स्थान गाठले. ३३ वर्षीय मध्यरक्षक एरिक पार्टालू याने पहिला गोल केला, तसेच दुसर्‍या गोलची चाल रचली.

आधीच्या लढतीत बेंगळुरूने एफसी गोवा संघाला धक्का दिला होता. कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे मनोधैर्य त्या निकालामुळे उंचावले होते. घरच्या मैदानावर त्यांनी दमदार कामगिरी केली. दोन्ही सत्रांच्या आरंभी गोल करीत त्यांनी जमशेदपूरला संधी अशी दिलीच नाही. बेंगळुरूने याबरोबरच गुणतक्त्यात एका क्रमांकाची प्रगती केली. त्यांनी एटीके एफसीला (११ सामन्यांतून २१) मागे टाकत दुसरा क्रमांक गाठला. बेंगळुरूने १२ सामन्यांत सहावा विजय मिळविला असून चार बरोबरी आणि दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २२ गुण झाले. एफसी गोवा १२ सामन्यांतून सर्वाधिक २४ गुणांसह आघाडीवर आहे.

जमशेदपूरसाठी हा निकाल निराशाजनक ठरला. पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या त्यांच्या आशांना हादरा बसला. जमशेदपूरला ११ सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. तीन विजय आणि चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे १३ गुण आणि सहावे स्थान कायम राहिले.

आठव्याच मिनिटाला बेंगळुरूने खाते उघडले. यात सेट-पिसेसवरील बेंगळुरूचे कौशल्य निर्णायक ठरले. उजवीकडे मिळालेला कॉर्नर मध्य फळीतील डिमास डेल्गाडो याने घेतला. त्यावर पार्टालू याने उंच उडी घेत नेटच्या दिशेने अचूक हेडिंग करीत लक्ष्य साधले. दुसर्‍या गोलची चाल पार्टालू याने रचली. त्याने बेंगळुरूच्या क्षेत्रातून लांब पास देताच छेत्रीने अचूक अंदाज घेत घोडदौडकेली. छेत्रीने जमशेदपूरच्या नरिंदर गेहलोत याच्याबरोबरच गोलरक्षक सुब्रत पॉल यालाही चकविले. या दोघांच्या मधून मुसंडी मारत त्याने हेडिंगवर लक्ष्य साधले.

निकाल
बेंगळुरू एफसी : २ (एरिक पार्टालू ८, सुनील छेत्री ६३) विजयी विरुद्ध जमशेदपूर एफसी : ०