>> पणजी, मडगाव, कांदोळी, पर्वरी, फोंड्यात वाढता उद्रेक
>> रविवारी १३१ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची आणि बळींची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्यात आत्तापर्यंत नवे २५९८ बाधित रुग्ण आढळून आले असून ३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत नवे १३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आणखी २ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या १४०४ एवढी झाली असून कोरोना बळींची एकूण संख्या ८२६ एवढी झाली आहे.
फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. पणजी, मडगाव, फोंडा, वास्को, पर्वरी, कांदोळी या भागात मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळून येत आहेत. राज्य प्रशासनाने कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत पणजी, ढवळी आणि पर्वरी येथे तीन लहान कन्टेनमेंट झोन जाहीर केले आहेत. तसेच, राज्यात कोरोना नियंत्रणासाठी १४४ कलम लागू केले आहे. विधानसभेत कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत कोरोना रुग्ण या विषयावर बोलताना, कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक सूचना त्वरित जारी करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, आरोग्य खात्याकडून नवीन एसओपी जारी करण्यात आलेली नाही. मार्च महिन्याच्या २८ दिवसांत राज्यात नवे २५९८ कोरोना रुग्ण आढळून आले असून ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच काळात नवीन ४३० रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यात मार्च महिन्यात आत्तापर्यंत ४५ हजार ९७२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ५.६५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
सध्याची रुग्णसंख्या १४०४
राज्यात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या पाचशेपेक्षा कमी झाली होती. आता पुन्हा एकदा सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १४०४ एवढी झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५७,५८४ एवढी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी १०४ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५५ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत नवीन १७६७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ६.८२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ४८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
पर्यटकांवर निर्बंध नाहीत
राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षाही जवळ येत आहे. यंदाही पुन्हा परीक्षांच्या काळात कोरोनाचा कहर राज्यात असेल का या भीतीने पालक चिंतित झाले आहेत. गोव्यात येणार्या प्रवाशांवर मात्र राज्य सरकारने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. गोव्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असूनही पर्यटन व्यावसायिकांना फटका बसेल म्हणून पर्यटकांवर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. राज्यात विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सक्रिय दिसून येत नाही. त्यामुळे मास्क व सामाजिक अंतराचे पालन न करता फिरणार्यांचे प्रमाण मोठे आहे.
दोघांचा बळी
साळगाव येथील एका ३० वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला आहे. अन्य आजार असलेल्या या महिला रुग्णाला १६ मार्च २०२१ रोजी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आली होती. २८ मार्चला सकाळी सदर महिला रुग्णाचा मृत्यू झाला. वार्का येथील एका ७३ वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या महिलेला ८ मार्च २०२१ रोजी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
शब ए बरात उत्सव रद्द
अखिल गोवा मुस्लीम जमात संघटनेने शब ए बरात हा उत्सव रद्द केला. या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राज्यात १४४ कलम लागू केल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष शेख बशीर अहमद यांनी सांगितले.