१२ लाखांचे सुवर्णालंकार लुटले
सहा दिवसांमागे नुवे येथे रात्रौ चोरानी राजू गोम्स यांच्या घरात घुसून घरातील माणसावर प्राणघात हल्ला करून लाखो रुपयांची चोरी केली होती. त्याचा तपास लावण्यात अपयश आले असताना काल भरदुपारी मोडशिमेभाट मायणा-कुडतरी येथे मारियो आंतोनेत नोरोन्हा यांचे घर फोडून अंदाजे १२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले. या घटनेने तिच्यावर फार माठे संकट कोसळले आहे.मारिया आंतोनेत नोरोन्हा कुटुंबीय अत्यंत गरीब असून काबाडकष्ट करत ती व आई पोट भरतात. त्यात मारियाचा विवाह चारपाच दिवसांवर येऊन ठेपला होता. तिच्या विवाहित बहिणी विदेशात असून त्यांनी मारिया व नवर्यासाठी सोन्याचे दागिने करून आणले होते. काल दुपारी ११.३० वा. मारिया बहिणीच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी घरबंद करून गेली तर तिची आई शेतात गेली होती. ही संधी साधून दोघा चोरांनी आत घुसून पाच सोन्याच्या बांगड्या, दोन माळा, सहा अंगठ्या, कर्णफुले, चार ‘मास्कोत’ सोन्याची साखळी चोरून नेली.
कोणीतरी घराचा दरवाजा खुला असल्याची माहिती मारिया यांना देताच ती धावत घरी आली असता दोघे चोर घरातून पळाले. तिने चोरचोर अशी आरडाओरड करताच शेजारीही त्यांना पकडण्यासाठी धावले पण ते हाती लागले नाहीत. जाताना त्यानी टाकून दिलेली जीए- ०२- एम- २३२२ क्रमांकाची मोटरसायकल सापडली आहे पण ती मोटरसायकल वेर्णा येथून चोरीस गेल्याची तक्रार नोंद झाली आहे. विवाह जवळ ठेपला असल्याने तिच्या कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले असून निरीक्षक हरीश मडकईकर तपास करीत आहेत.