मानसिक आरोग्य ः सार्वत्रिक मानवी हक्क

0
17
  • डॉ. मनाली महेश पवार

दरवर्षी 10 ऑक्टोबर हा जगभरात ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ म्हणजेच ‘जागतिक मानसिक आरोग्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक आजारांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागृती व गांभीर्य निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

दरवर्षी 10 ऑक्टोबर हा जगभरात ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ म्हणजेच ‘जागतिक मानसिक आरोग्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे हा यामागील उद्देश आहे. ‘वेडा म्हणजे मनोरुग्ण किंवा मानसिक आजार’ ही व्याख्या आता कालबाह्य झाली आहे. मानसिक आजार म्हणजे काय? डॉक्टरांकडे मानसिक आजार झाल्यावर का जावे व कुठल्या डॉक्टरकडे जावे? मानसिक आजाराची चिकित्सा म्हणजे ‘शॉक ट्रिटमेंट’ का? असे बरेच समज-गैरसमज दूर करण्यासाठी हा 10 ऑक्टोबर ‘मानसिक आरोग्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक आजारांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे, त्यामुळे लोकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत गांभीर्य निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

आज जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे व याचे मूळ कारण डिप्रेशन, एन्झायटी वगैरे असते. मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवणे खूप कठीण होत चालले आहे. मानवाला आत्महत्येच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठीचा हा प्रयत्न चालू आहे. म्हणून मानसिक आजार व त्याचे व्यवस्थापन-चिकित्सा जाणून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याला अनुसरूनच या वर्षीची मानसिक आरोग्य दिवसाची थीम आहे- ‘मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क!’
जीवनाचे किंवा आयुष्याचे प्रयोजन सुखप्राप्ती हे आहे आणि त्याचे माध्यम आहे शरीर व मन. म्हणून सुखप्राप्तीसाठी शरीर व मानसस्वास्थ्य बऱ्याच प्रमाणात परस्परावलंबी असते. आयुर्वेदशास्त्रामध्ये आरोग्य म्हणजे स्वास्थ्याची व्याख्या करताना मनाचाही विचार केला गेला आहे. मनाला शरीराइतकेच अनन्यसाधारण महत्त्व आहे.
समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः।
प्रसन्नात्मेंद्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते॥

  • स्वास्थ्य म्हणजेच आपल्या शरीर-मनाचे स्वास्थ्य. हे स्वास्थ्य असणे म्हणजेच त्याच्या क्रियाव्यापारात कोणतेही वैषम्य नसणे. शरीरात जे वात-पित्त कफ-दोष आहेत ते समस्थितीत असणे. यांच्या सर्व क्रियाव्यापारांना अग्नीचे बल अत्यावश्यक आहे. यांच्या सुयोग्य क्रियाव्यापारामुळे इंद्रियांची प्रसन्नता व इंद्रियप्रसन्नतेमुळेच मनाची प्रसन्नता टिकते. या सर्व गोष्टींमध्ये प्रसन्नता असल्यानंतर या प्रसन्नतेचा, सुखाचा भोग आत्म्याला मिळतो व आत्मा म्हणजे आपण- त्यामुळे सुखी व प्रसन्न राहतो. मनामध्ये रज-तम दोषांमुळे उद्भवणारे दुर्विकार न येता मन प्रसन्न असणे हे आरोग्याचे लक्षण आहे.
    मानसिक आजारांची कारणे
    आयुर्वेदशास्त्रामध्ये ‘प्रज्ञापराध’ हे मानसिक रोगाचे महत्त्वाचे कारण सांगितले आहे. मनाच्या रज-तम दोषांमुळे निर्माण होणारी ईर्ष्या, द्वेष, मत्सर, चिंता, भय, मोह इत्यादी विकारांचे प्राबल्य मनुष्याकडून प्रज्ञापराध घडवतो व हे अनेक मानसिक आजारांना कारणीभूत आहे.

साध्या-साध्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्या हातून घडतात व याचे योग्य ज्ञान नसल्याने चुका घडत जातात आणि यातूनच शारीरिक व मानसिक आजारांची उत्पत्ती होते. आयुर्वेदशास्त्रात मनाचे कार्य व दोषांचा खूप सुप्त विचार मांडला आहे. त्यामुळे ‘प्रज्ञापराध’ म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊ.
धीधृतिस्मृतिविभ्रष्टः कर्म यत्कुरुते अशुभम्‌‍।
प्रज्ञापराधं तं विद्यात्‌‍ सर्वदोषप्रकोपणम्‌‍॥

  • बुद्धी, धृती म्हणजे संयमनशक्ती. स्मृती म्हणजे स्मरणशक्ती. या जेव्हा भ्रष्ट होतात तेव्हा मनुष्य अशुभ कर्म करण्यास प्रवृत्त होतो. यालाच ‘प्रज्ञापराध’ असे म्हणतात. याने सर्व दोषांचा प्रकोप होऊन शारीरिक व मानसिक विकार होऊ शकतात. जे आहे तसे ज्ञात करून घेणे हे बुद्धीचे काम असते. बुद्धी भ्रष्ट झाली की काय हितकर, काय अहितकर आहे, काय क्षणभंगुर आहे, काय टिकणारे आहे हेच समजत नाही. चांगले काय- वाईट काय हे कळेनासे होते. जे करायला नको तेच नेमके करावेसे वाटते. निर्णय घेणारी बुद्धी चुका करायला लागली की सगळेच शारीरिक-मानसिक व्यवहार चुकीचे होत जातात. बुद्धीबरोबर धृती व स्मृती यासुद्धा योग्य निर्णय घेण्यासाठी व त्याप्रमाणे क्रिया घडण्यासाठी जबाबदार असतात. बुद्धीने योग्य निर्णय घेतला तरी मनाला त्या बाजूला वळविण्याचे काम धृती करत असते. धृती नष्ट झाली की विषयांकडे ओढ घेणाऱ्या मनावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे चुकीची कर्मे घडतात. आपण जे करत आहोत, वागत आहोत ते चुकीचे आहे हे माहीत असते, पण त्या क्षणी मोह आवरत नाही. अशावेळी बुद्धीने जरी योग्य निर्णय दिला तरी धृतीची नियमनाची शक्ती अपुरी पडते व चुकीचीच गोष्ट घडते. बुद्धी व धृतीनंतर येते स्मृती. यापूर्वी झालेल्या त्रासाचे कारण लक्षात जरी आले तरी जर स्मृतीच भ्रष्ट झाली तर पुन्हा पुन्हा त्याच चुका होत राहतात.
    रज व तमाने मन युक्त झाले की याप्रकारे बुद्धी, धृती व स्मृती भ्रष्ट होते. प्रज्ञेचा अपराध होतो व अनेक शारीरिक, मानसिक विकारांना सुरुवात होते. यातून पुढे दुःख, वेदना निर्माण होतात. म्हणजेच सर्व चुकीची शारीरिक व मानसिक कर्मे प्रज्ञापराधामुळे घडतात.
  • खोटी बोलणे.
  • चोरी करणे (दुसऱ्याची वस्तू न विचारता घेणे, हीसुद्धा चोरीच).
  • हिंसा (मारणे, ओरडणे इत्यादी)
  • खूप गोष्टींचा साठा करणे, दुसऱ्याच्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटणे किंवा दुसऱ्याच्या गोष्टी ओरबाडणे.
  • विनयवृत्ती, सदाचार वगैरे मानसिक मूल्यांचा त्याग करणे.
  • पूजनीय व्यक्ती, गुरुजनांचा अनादर वा अपमान करणे.
  • चुकीचे आहे हे माहीत असूनही एखादी कृती करणे.
  • अवेळी, अयोग्य ठिकाणी भटकणे.
  • मन उत्कंठित करणाऱ्या क्रिया अतिप्रमाणात करणे.
    ही सगळी छोटी-छोटी वाटणारी कारणे जेव्हा सातत्याने घडतात, त्यातूनच ताण-तणाव, चिंता, भय, औदासिन्य, अनिद्रा, श्रम, उन्माद इत्यादी मानसिक आजारांचा जन्म होतो.
    या कारणांबरोबरच आताच्या युगातल्या मानसिक आजारांची कारणे म्हणजे जीवघेणी स्पर्धा, मोबाईलचा अतिवापर, व्यायामाचा अभाव, विभक्त कुटुंबपद्धती, निःसत्त्व आहार सेवन, व्यसनाधीनता, पूर्वायुष्यातील मानसिक आघात व अनुवांशिकता.
  • जीवघेणी स्पर्धा ः सध्याच्या काळात मानसिक आजारांना सामोरे जायला भाग पाडणारे ‘स्पर्धा’ हे मुख्य कारण आहे. ही स्पर्धा सगळ्याच क्षेत्रांत लहानांपासून मोठ्यांपर्यंत चालू आहे. सगळ्यांनाच अव्वल (पहिला) यायचे असते. अपयश कुणालाच पचवता येत नाही. एखाद्यामध्ये चांगला गुण, कला असेल तर ती फुलवा; ती स्पर्धेतच का उतरवायला हवी? अगदी लहान-लहान वयामध्ये पाल्यांना कारनामे करायची जिद्द. इथूनच कुठेतरी सब-कॉन्सिअस माईंडमधून भीती, ताण, उदासीनता इत्यादी मानसिक आजारांची उत्पत्ती होते. सतत मनावर येणाऱ्या दडपणाने मनोविकार उत्पन्न होतात व मनुष्य आनंदाने जीवन जगणेच विसरून जातो. स्पर्धा इतरांबरोबर करता-करता ती आप्त-इष्टांबरोबर व्हायला लागली व जो-तो मद, मत्सर, लोभ या विकारांनी विकृत होत चालला आहे.
  • मोबाईलचा अतिवापर ः मोबाईलसारखे उपकरण लहानांना तसेच मोठ्यांना अधोगतीकडे घेऊन चालले आहे. मोबाईलवरील खेळ आत्महत्या करायलाही प्रवृत्त करतात. हिंसक खेळ, दृश्यांनी मुलांतील हिंसकता वाढत चालली आहे. अश्लील दृश्ये पाहून मुले लहान वयातच मोठी होऊ लागली आहेत. त्यांचे बालपण मोबाईलमध्ये हरवले आहे. मुलं-मुली असुरक्षित व्हायला लागली आहेत. सततच्या वापराने डोकेदुखी, डोळ्यांचे आजार, विस्मरण, निद्रानाशसारखे मानसिक आजार वाढत आहेत.
  • व्यायामाचा अभाव ः प्रगत युगामध्ये सर्व कामे आता यंत्राच्या सहाय्याने होत चालली आहेत. त्यामुळे शारीरिक श्रमाचा अभाव होत आहे. त्यातून लठ्ठपणासारखे आजार लहानवयातूनच आयुष्यावर राज्य करत आहेत. परिणामी आळस, अतिनिद्रा, उदासीनतासारखे विकार वाढत आहेत. त्याबरोबर पुढे जाऊन हायपरटेन्शन, हृदयरोगासारखे आजार आयुष्याला विळखा घालत आहेत.
  • विभक्त कुटुंबपद्धती ः आजची त्रिकोणी, चौकोनी कुटुंबपद्धती मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढच होऊ देत नाही. मुलांची सर्वतोपरी वाढ खुंटत चालली आहे. मुलं एकटेपणात जगत आहेत. पालकांच्या व्यस्त जीवनपद्धतीमुळे मुलांना योग्य संस्कार मिळत नाहीत. चूक-बरोबर दाखवायला आजी-आजोबा, काका-काकी, आत्या, मामा-मामी इत्यादी नातीच उरली नाहीत. आणि असलीच तर त्यांच्या-त्यांच्यामध्ये घर-पैसा-गाडी यांतून वरचढपणा दाखवायची स्पर्धा. मुलांना अपयश पचत नाही. मुले रागीट होत चालली आहेत. सारखी चिडचिड व सारख्या आवाक्याबाहेरच्या मागण्या. मुले तणावाखाली यायला, असुरक्षित बनायला ही विभक्त कुटुंबपद्धती खरेच कारणीभूत आहे. यावर प्रत्येकाने विचार करावा.
  • निःसत्त्व आहार सेवन ः सात्त्विक आहार सेवन केल्याने मनातील सत्त्वगुणांची वृद्धी होते व मनुष्याकडून प्रज्ञापराध होत नाही. पण आजकाल सर्रास खूप प्रमाणात फास्ट फूड, जंक फूड, झटपट बनणारा पदार्थ अशा निःसत्त्व आहाराचे सेवन होत आहे. यातून ना शरीराचे ना मनाचे पोषण होत. मनाचे तम व रज गुण मात्र वाढतात व यातूनच राग, द्वेष, मोह, चिडचिड, उदासीनता यांसारखे दोषविकार वाढतात व कितीतरी मनोविकार उत्पन्न होतात. सर्व रोगांचे मूळ हे ‘आहार’च आहे व आरोग्याचे मूळ तेही ‘आहार’च आहे.
  • व्यसनाधीनता ः व्यसनाधीनता वाढल्याने खरे-खोटे, चांगले-वाईट, आपले-परके अशा सगळ्याचा विसर पडतो व मनुष्याकडून गैरवर्तन वाढत जाते आणि मनोविकारांची उत्पत्ती होते.
  • पूर्वायुष्यातील मानसिक आघात ः गैरवर्तुणूक किंवा भयानक वाईट पाहिलेले असल्यास त्याचा आघात खोल मनावर होतो व त्यातूनच मनोविकृती निर्माण होते.
  • अनुवंशिकता ः काही प्रमाणात अनुवांशिकतेनेही मनोविकार उत्पन्न होतात.

मानसिक आजारांची ही कारणे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण कमी-अधिक प्रमाणात बरेचसे लोक सध्या मानसिक आजार किंवा लक्षणांना सामोरे जात आहेत. कारण समजल्यास, या कारणाचे निर्हरण करण्याने आपला 50 टक्के आजार इथेच बरा होतो.
मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयरोग इत्यादी मोठे आजार हे मानसिक लक्षणांतून, रोगांतूनच उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे सतत राग-राग, चिडचिड, हृदय धडधडणे, डोकेदुखी, जुलाब होणे, नैराश्य, आत्मविश्वास नसणे, दुःखी होणे, उदास वाटणे, एकाकी वाटणे वगैरे ही मानसिक आजाराची लक्षणे आहेत.
अशी काही लक्षणे आढळली तर मानसतज्ज्ञाकडे जाण्यास लाजू नका किंवा योग्य वैद्याचा सल्ला घ्या. समुपदेशन ही महत्त्वाची चिकित्सा या आजारावर आहे. त्याचबरोबर आयुर्वेदशास्त्रामध्ये शिरोधारा, नस्य, मेध्य रसायन अशा प्रकारची चिकित्सा सांगितली आहे.
आयुर्वेदशास्त्र हे स्वास्थ्य टिकवण्याचे शास्त्र आहे. म्हणून या शास्त्राने व्याधी उत्पन्न होऊ नयेत म्हणून शरीर व मन प्रसन्न ठेवावे आणि यासाठी सद्वृत्तीचे पालन करावे असे सांगितले आहे.