मानसिक आजार

0
607

डॉ. मनाली म. पवार
गणेशपुरी-म्हापसा

मानसिक आजार होऊ नये यासाठी अगोदरपासून काळजी घेतलेली चांगली. तणावाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करणे, नियमित योगसाधना करणे, यम-नियमांचे पालन करणे… उत्तम!

तणावपूर्ण प्रसंग झाल्यावर व्यक्तीच्या वागणुकीत बदल होतात. एकदम उत्तेजित किंवा मलूल होणे, हसणे-रडणे, गोंधळल्यासारखे वागणे, इकडे-तिकडे फिरणे, विसरणे किंवा एकटक पाहत राहणे. ही स्थिती साधारण दोन दिवस राहते. समुपदेशनाने ही स्थिती सुधारते.

दिवसेंदिवस आत्महत्याच नव्हे तर इतरही मानसिक आजारांचं प्रमाण वाढत आहे. १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी सरकारी किंवा निमसरकारी संस्था मानसिक आरोग्यासाठी समुपदेश कार्यक्रम करतात. मानसिक आरोग्यासंबंधी प्रबोधन चालू असते. तणाव, नैराश्य, स्मृतिभ्रंश असे मानसिक आजाराचे विविध पैलू आहेत. आज बालांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण वेगवेगळ्या तणावातून जात असतो. काही नैराश्याकडे झुकतात तर काहींचा स्मृतिभ्रंश होतो.

आयुर्वेद शास्त्रामध्ये आरोग्याची व्याख्या करताना फक्त शारीरिक पैलूचा विचार न करता मानसिक आरोग्याचे महत्त्वही विषद केले आहे.
प्रसन्नात्मेंद्रियमन स्वस्थ इत्येभिधियते ॥
म्हणजेच मन, आत्मा, इंद्रिय ही जेव्हा प्रसन्न रोगरहित असतील तेव्हाच स्वस्थ म्हटले जाते. मानसिक आरोग्य हे मेंदू, शरीर आणि मन या तिन्हीशी निगडित असल्यामुळे या तिघांमध्ये संतुलन असणं खूप गरजेचं असतं. हे संतुलन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं मानसिक आरोग्य उत्तम आहे.

सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात अनेक कारणांमुळे आपलं मानसिक आरोग्य ढासळत चाललं आहे. प्रत्येकजण शर्यतीत उतरला आहे. सगळ्यातच प्रथम येण्याची हाव वाढत चाललेली आहे. परिग्रह करण्याची वृत्ती वाढली. ‘धनसंचय’ जगण्यातला अविभाज्य भाग बनला आहे. यश, कीर्ती नाही तर जीवन व्यर्थ अशी काहीशी भावना कित्येक जणांमध्ये दिसते आहे. प्रत्येकजण टार्गेटच्या मागे लागला आहे. विद्यार्थीदशेतील मुलांना गुणांचे टार्गेट आणि नोकरी-व्यवसाय करणार्‍यांना ‘इनकम’चे टार्गेट. वृद्धापकाळात काहीच टार्गेट नाही म्हणून चिंता. म्हणजे सगळेच तणावाखाली. पूर्वी वाढत्या वयात या आजाराचं प्रमाण दिसून येत असे. आज मात्र असे राहिलेले नाही. पहिलीत शिकणार्‍या मुला-मुलींमध्येसुद्धा हे प्रमाण वाढत चाललंय. आजच्या स्पर्धेच्या युगात मनात आलेली आणि हवी असलेली गोष्ट लगेच हवी आहे आणि पालकही उगाच त्रागा- कटकट नको म्हणून त्यांच्या मागण्या लगेच पुरवतात. परिणामी कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो संयम लागतो तो आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. अतिमहत्त्वाकांक्षेपायी आजचा तरुण तणावाखाली वावरतो आहे.
आज सगळीकडे विभक्त कुटुंबपद्धती पहायला मिळते. मुलांना पाळणाघरात व आईवडलांना वृद्धाश्रमात. आजी-आजोबा, काका-काकी, मामा-मामी, आत्या-मावशी ही सगळी नाती दुरावलीत. बहुतेक कुटुंबं ‘हम दो हमारा एक’ अशी त्रिकोणी होत चाललीयत. त्यामुळे नात्यांचा कोणताच गोतावळा नाही. एकत्र कुटुंबपद्धती असताना साहजिकच सर्वांना आपलं मन मोकळं करण्यासाठी घरात खूप लोकं असायची. विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये सदस्यांची संख्या कमी असल्यानं लहान मूल चिडचिडं बनतं. घरात त्यांच्याशी बोलायला कुणीच नसल्यानं मुलं त्यांच्या खेळण्यांशी बोलतात, काहीतरी करत बसतात किंवा सतत टीव्हीसमोर, मोबाइलमध्ये तासन्‌तास आपला वेळ घालवतात. आईवडलांचं मुलांबरोबर खेळणं नाही, दंगा-मस्ती नाही, आजी-आजोबांच्या गोष्टी नाही. गोष्टी- भाषणे आता कथाकथन स्पर्धांपुरतीच मर्यादित राहिली आहेत. पालकही दिवसभर बिझी व मुलंही. दिवसातले साधारण ६ ते ८ तास शाळा व क्लासेसमध्येच. मुलं जन्माला घालायचीच स्पर्धेला उतरवण्यासाठी.. असे काहीसे चित्र सध्या दिसते आहे. आपले मूल प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कलेत, प्रत्येक स्पर्धेत पुढे यावे हा अट्टहास का? यात पालक व पाल्य दोघेही मानसिक तणावाखाली येतात व मानसिक आजार यांना केव्हा जडतो याचीही जाणीव त्यांना नसते.

ताण ही सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे ना! नैराश्य व स्मृतिभ्रंश हे सर्वांत जास्त आढळणारे मानसिक आजार आहेत. रोजच्या आयुष्यातील दगदग, अपयश, नकार, विरह, पैशांचे व्यवस्थापन हे ताण वाढवणारे असतात. काही वेळा यापेक्षाही अधिक तणावपूर्ण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अपघात, जिवावर बेतलेले प्रसंग, सामाजिक बहिष्कार – बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी अपमान यांपैकी एखाद्या कारणाने आत्मसन्मानावर झालेला आघात, पूर-भूकंप सारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो.

तणावपूर्ण प्रसंग झाल्यावर व्यक्तीच्या वागणुकीत बदल होतात. एकदम उत्तेजित किंवा मलूल होणे, हसणे-रडणे, गोंधळल्यासारखे वागणे, इकडे-तिकडे फिरणे, विसरणे किंवा एकटक पाहत राहणे. ही स्थिती साधारण दोन दिवस राहते. समुपदेशनाने ही स्थिती सुधारते. योगसाधना ह्यासाठी उत्तम पर्याय आहे.
काही व्यक्ती तणावातून बाहेरच येत नाही. सतत तोच विचार करतात. भित्रेपणा, उदासीनता, चिडचिड वाढते. जीवनात नियोजन करणे जमत नाही. इतर व्यक्ती व घटनांपासून अलीप्त राहायला सुरुवात करतात. त्यामुळे नात्यांमध्ये अंतर येऊ लागते. अशा व्यक्तींना योग्य समुपदेशन व औषधे दिली तर लगेच फरक पडतो.

नैराश्याची लक्षणे –
– सतत आणि तीव्र स्वरुपाच्या मानसिक वेदना होतात.
– मन बधिर, अस्वस्थ आणि असमाधानी होते.
– सतत रडू येते, काही करावेसे वाटत नाही.
– भूक व झोप कमी होते.
– मनात आत्महत्येचेे विचार येतात.
– काही व्यक्ती दारू किंवा झोपेच्या गोळ्यांच्या आहारी जातात.
नैराश्याची लक्षणे कमी-जास्त होतात. नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असेल तर व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात पण ते कमी असेल तर व्यक्तीमधले बदल एवढे हळू होतात की तो आजार आहे हे लक्षात येत नाही. नैराश्याने समुपदेशनाचा खास उपयोग होतो पण समुपदेशकांशी नुसत्या गप्पा मारून निराशा कमी होत नाही. समुपदेशन म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असते. त्यात रुग्णाला मेहनत घ्यावी लागते. समुपदेशन डोळसपणाने घ्यावे. सांगितलेले योग्य बदल करण्याची क्षमता रुग्णांमध्ये असावी. नैराश्यासाठी विशिष्ट औषधे असतात ती दीर्घकाळ घ्यावी लागतात.

स्मृतिभ्रंश –
वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती थोडीफार कमी होणे स्वाभाविक असते. मात्र यामुळे सहसा दैनंदिन व्यवहारात व वागणुकीत अडथळा येत नाही. मात्र स्मृतिभ्रंशामध्ये स्मती इतकी कमी होते की जवळचे कुटुंबीय ओळखता येत नाही. स्वतःच्या घरचा पत्ता आठवणे, रस्ता लक्षात न राहणे यासारख्या प्राथमिक गोष्टीही लक्षात राहत नाहीत.
आयुर्वेदशास्त्रात या अवस्थेला स्मृतिभ्रंश, स्मतिनाश असे म्हटले जाते.
स्मृती म्हणजे पूर्वी अनुभवलेल्या गोष्टी लक्षात राहण्याला ‘स्मृती’ म्हणतात. मिळालेली माहिती मेंदूत साठवून योग्य वेळेला व्यक्त करणे स्मृतीचे मुख्य काम असते. ‘स्मतीभ्रंश’ म्हणजे स्मृती विचलीत होणे. रज व तम या मानसिक दोषांनी मन व्यापले तर त्यामुळे स्मरणशक्ती विचलीत होते. ज्यामुळे यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही, याला स्मृतिभ्रंश म्हणतात. याच्या पुढच्या अवस्थेला स्मृतिनाश म्हणतात.

स्मतिभ्रंश लक्षणे –
– स्मरणशक्तीचा र्‍हास होणे हे महत्त्वाचे लक्षण होय. याखेरीज व्यक्ती तीच ती माहिती पुन्हा पुन्हा विचारते किंवा सांगते.
– जी गोष्ट क्रमवार करायची असते ती करता येत नाही. उदा. स्वयंपाक करण्याचा विशिष्ट क्रम असतो तो लक्षात राहत नाही.
– पूर्वी एखादे काम करायला जेवढा वेळ लागायचा तेच काम करण्यासाठी कितीतरी जास्त वेळ द्यावा लागतो.
– रहदारीचे नियम किंवा एखादा खेळ पाहताना खेळाचे नियम लक्षात येत नाहीत.
– रस्ते समजत नाहीत
– तारीख, वार, महिना, चालू असलेल्या ऋतूचे भान राहत नाही.
– रंगसंगती समजत नाही. कधी कधी आरशातील स्वतःचे प्रतिबिंब ओळखता येत नाही.
– वस्तू जागेवर ठेवणे समजत नाही. स्वतः ठेवलेली वस्तू काही वेळाने दुसरीकडे शोधली जाते.
– अशी व्यक्ती मित्रमंडळींमध्ये रमत नाही. समाजामध्ये मिसळणे टाळू लागते.
– वैचारिक गोंधळ, उदासीनता, नैराश्य, संशय, भीति, अस्वस्थता अशा अनेक भावना मनात येतात.

एकंदरच या विकारात स्वतः व्यक्तीची मानसिकता पूर्णतः बदलते आणि याचा भार कुटुंबीय, मित्रमंडळींवर येणे स्वाभाविक असते. या आजारावर उपचार शोधण्यासाठी जगभर मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे. मात्र मेंदूच्या इतर कोणत्याही विकाराप्रमाणे यावरही १००% बरे करणारे उपचार अजून तरी मिळणे शक्य झालेले नाही.

मात्र रोग होऊ नये यासाठी व रोग झालाच तर मेंदूची झीज कमीकत कमी व्हावी, लक्षणांची तीव्रता आटोक्यात रहावी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जे काही आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने व आनंदाने जपता यावे यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग होताना दिसतो.
स्मृतिभ्रंश किंवा एकंदरित मानसिक आजारांवर उपाय….
– आहारामध्ये मेंदूला पोषक अशा द्रव्यांचा अंतर्भाव अवश्य करणे. यादृष्टीने पंचामृत हा एक साधा, सोपा, प्रत्येकाला घरच्या घरी करता येईल असा, पण मेंदूसाठी प्रभावी योग होय, एक चमचा तूप, एक चमचा मध, एक चमचा दही, एक चमचा साखर आणि पाच-सहा चमचे दूध हे मिश्रण म्हणजेच पंचामृताचे नियमित सेवन करावे.
– वाढत्या वयानुसार शरीराची शक्ती, मनाचा उत्साह कमी होऊ नये यासाठी आयुर्वेदाने रसायने सांगितली आहेत. यात पंचगव्यघृत, ब्राह्मी घृत, च्यवनप्राश यांसारख्या रसायनाचा समावेश होतो. योग्य रसायनाच्या नियमित सेवनाने शक्ती कायम ठेवली तर मेंदूसारख्या अति महत्त्वाच्या अवयवाची कार्यक्षमता कायम राहून मेंदूचे विकार होण्याला निश्‍चित आळा बसू शकतो.
– मेंदूची कार्यक्षमता व्यवस्थित राहण्यासाठी त्याला प्राणशक्तीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा लागतो. त्या दृष्टीने दीर्घश्‍वसन, प्राणायाम, कपालभातीसारख्या व्यसनक्रिया नियमित करणेही हितावह होय.
– संगीताचा म्हणा, कलेचा मेंदूच्या सगळ्या रोगांवर खूप उपयोग होताना दिसतो.
– मेंदूला प्राणशक्तीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी शरीरात विषद्रव्य साठणार नाहीत किंवा वेळच्या वेळी त्याचा निचरा करून मेंदू, चेतासंस्था शुद्ध राहतील यासाठीही प्रयत्न करावे लागतात. यासाठी आहार शुद्ध, सात्विक व नैसर्गिक असणे महत्त्वाचे. चाळीशीच्या आसपास एकदा शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म करून घेणेही उत्तम.
– डोक्याला नियमित तेल लावणे, अधिक फायद्यासाठी डोक्याला औषधी सिद्ध तेलाचा किंवा तुपाचा शिरोपिचू ठेवणे, मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच बुद्धी व स्मृती कार्यक्षम राहण्यासाठी उपयोगी असते. ब्राह्मी, जटामांसीू, कमळ, वेखंड वगैरे मेंदूसाठी, पोषक द्रव्यांनी संस्कारित तेल किंवा तूप यासाठी वापरता येते.
– रोज रात्री झोपण्यापूर्वी नस्य करणे म्हणजे दोन्ही नाकपुड्यांमध्ये सिद्ध तेल वा तूप किंवा घरी बनवलेले साजूक तूप टाकणे हेसुद्धा मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम असते. पंचेंद्रियवर्धन तेल यासाठी वापरता येते.
– ‘सुवर्ण’ हे तर मेंदूसाठी अमृतोपम रसायन असते. सुवर्णामुळे प्रज्ञा वाढते, वीर्यशक्ती वाढते, बलप्राप्ती होते, स्मृतिवर्धन होते, स्वर सुधारतो, कांती तेजस्वी होते.
– सुवर्णसंस्कारित सारस्वतारिष्ट घेणे किंवा रोजच्या आहारात सुवर्ण – केशरयुक्त कल्प समाविष्ट करणे उत्तम होय.
मानसिक आजार होऊ नये यासाठी अशा प्रकारे अगोदरपासून काळजी घेतलेली चांगली. तणावाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करणे, नियमित योगसाधना करणे, यम-नियमांचे पालन करणे, प्राणायाम तेव्हाच शक्य होतो जेव्हा यमनियमांचे योग्य पालन होते.
मानसिक आजाराची सुरुवात होताच लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णयुक्त ब्राह्मीस्वरसाचे नस्य, ब्राह्मी, शतावरी वगैरे स्मृतिवर्धक वनस्पतींनी सिद्ध घृत वा तेलाची शिरोबस्ती वगैरे उपचार करता येतात.
सुवर्ण भस्म तसेच अभ्रक भस्मही मेंदूला पोषक, बुद्धी-स्मृतिवर्धक सांगितले आहेत. तेव्हा त्यांचीही योग्य योजना करता येते.