‘एक्झिमा’ ः भाग – २

0
485
  • डॉ. स्वाती हे. अणवेकर
    म्हापसा

    मानसिक ताण, अवेळी जेवण, जागरण, अवेळी झोपणे, प्रत्येक ऋतूमध्ये योग्य प्रकारची वस्त्रे न वापरणे, शरीराची स्वच्छता न पाळणे, काही रासायनिक वस्तूंचा सतत संपर्क होणे व त्यातून पुढे हा व्याधी निर्माण होऊ शकतो.

आयुर्वेदामध्ये आपल्याला अर्वाचीन शास्त्रातील एक्झिमासारखा दुसरा व्याधी शोधून सापडणार नाही. कारण तशी दोन्ही शास्त्रांची तुलना करणे चुकीचे ठरेल. पण प्रत्यक्षामध्ये रुग्ण पाहत असताना एक्झिमासारखी लक्षणे अनेक वेळा अनेक रुग्णांमध्ये पाह्यला मिळतात. ह्यात प्रामुख्याने वात आणि कफ दोषाची दुष्टी होऊन ही लक्षणे रुग्णांमध्ये पाहायला मिळतात.

क्वचितप्रसंगी ह्यामध्ये पित्तदुष्टीदेखील अल्प प्रमाणात आढळून येते. तसेच ह्यात रक्त धातू, मेद धातू, मांस धातू ह्यांचीदेखील दुष्टी आढळून येते. रुग्ण आपल्याकडे येताना खालील प्रकारची लक्षणे घेऊन येतात ज्यात काही वेळा त्वचा कोरडी होते, तिथली त्वचा फक्त खाजवली असता तिथे खाज येते. कधी कधी तिथे टोचल्याप्रमाणे वेदना होतात. तिथल्या भागाची त्वचा कोंड्याप्रमाणे पडू लागते. अशी लक्षणे आढळल्यास ह्यामध्ये वाताचे अधिक्य आहे, असे समजावे.

बरेचदा रुग्णाला तिथला भाग सफेद अथवा राखाडी रंगाचा जाणवतो. त्या भागावर भरपूर खाज येते. तिथे कधी कधी पुळ्या येऊन त्यातून स्त्रावदेखील होतो व ते पसरते. क्वचित प्रसंगी जर ह्यामध्ये पित्त दोषाचा समावेश झालाच तर ह्याची लक्षणे जरा तीव्र स्वरुपाची जाणवतात. जसे त्वचा गुलाबी लालसर होणे, तिथे खाज व चुरचुर असून त्या भागी जळजळ देखील होणे, येणारे वण हे प्रथम त्वचेपासून वर उठलेले असून कालांतरांने ते त्वचेशी समांतर होताना दिसतात. त्यात असेदेखील आढळते की वातदोषाच्या प्राबल्याने अथवा दुष्टीने होणारा आजार जरी तीव्र लक्षणांचा नसला तरी बर्‍याच रुग्णांमध्ये तो काही काही काळाने बरा होणे व परत येणे असे चक्र सुरूच राहते. आणि प्रत्येक वेळी जेव्हा हा व्याधी नव्याने दिसतो तेव्हा त्याची लक्षणे पूर्वीपेक्षा वाढलेली आढळतात.

कफ दुष्टीमुळे जेव्हा हा व्याधी होतो तेव्हा त्याची सुरुवात अगदी संथ गतीने होते व पुढे पुढे त्याची तीव्रता व प्रसार वाढत जातो व हा बरा होण्यास बराच काळ जावा लागतो. जर का ह्यामध्ये थोडी जरी पित्ताची दुष्टी आढळून आली तर ह्या व्याधीची लक्षणे तीव्र गतीने वाढताना आढळतात.

रुग्ण जेव्हा वैद्याजवळ ह्या व्याधीसंबंधी तक्रार घेऊन येतो त्यावेळेस खालीलप्रमाणे लक्षणे त्यात आढळून येतात.
१) स्त्रियांमध्ये जननांग व मांडीच्या आतील बाजूस भरपूर खाज येते. तसेच बरेचदा त्या भागी काळपट निळसरपणा दिसून येतो. तिथली त्वचा कोरडी होते.
२) पुष्कळ वेळेस एखाद्या द्रव्याचा स्पर्श झाला असता शरीरावर लालसर चट्टे अथवा पांढरट चट्टे दिसून येतात. पुढे तिथे पुरळ येऊन मग ते पसरत जातात.
३) बरेचदा आपल्या शरीराला सूट न होणारा आहार पदार्थ जर आपण दररोजच्या जेवणात घेत असू तर त्यामुळेदेखील त्वचेवर पूर्वी सांगितल्याप्रमाणे असे चट्टे दिसून येतात.
४) पुष्कळ वेळेस एखादा दगड अथवा माती ह्यांचा संपर्क त्वचेशी येऊन तिथे जखम झाल्यास पुढे पुढे ती चिघळते व पसरत जाते व हा व्याधी वाढत जातो.
५) बरेचदा आपण वापरत असलेले कपडे आपल्या त्वचेला सूट करत नाहीत त्यामुळे देखील असा त्रास वारंवार होऊ शकतो.
६) दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे पालन न केल्यास देखील ह्या व्याधीचा त्रास आपणास होत राहू शकतो.
हा व्याधी होण्याची कारणे….
प्रथम आहारामध्ये वारंवार आंबवलेले पदार्थ, तेलकट, खारट, आंबट, अति कडू पदार्थ घेणे, दुध व दुधाच्या विकृती ह्या चुकीच्या आहार द्रव्यासोबत एकत्र करून खाणे, बेकरीचे पदार्थ, शिळे पदार्थ खाणे, अपचन असताना भूक नसताना खाणे, चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ खाणे… हे सर्व आहारातील घटक झाले.

तर अन्य घटकांमध्ये एखादा आजार जसे प्रमेह किवा वातरक्त ह्यामध्ये उपद्रव स्वरूप हा व्याधी होऊ शकतो. काही स्त्रियांना गरोदरपणामध्ये ह्या व्याधीचा त्रास होतो.घराण्यात जर ह्या व्याधीची अनुवांशिकता असेल तर हा व्याधी एका पिढीमधून दुसर्या पिढीत होऊ शकतो.आपल्या नैसर्गिक शारीरिक वेगाचे अडवून धरणे जसे संडास, लघ्वी, घाम, उल्टी, भूक, तहान, अधोवायू इ. त्यामुळे शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये भयंकर बिघाड होऊन आपण ह्या आजारास बळी पडू शकतो. तसेच मानसिक ताण, अवेळी जेवण, जागरण, अवेळी झोपणे, प्रत्येक ऋतूमध्ये योग्य प्रकारची वस्त्रे न वापरणे, शरीराची स्वच्छता न पाळणे, काही रासायनिक वस्तूंचा सतत संपर्क होणे व त्यातून पुढे हा व्याधी निर्माण होऊ शकतो.

आयुर्वेदानुसार उपचार …
प्रथम ह्यात पंचकर्ममधील रक्तमोक्षण, विरेचन ह्यासारखे उपक्रम केल्याने फायदा होतो. हे उपक्रम रुग्ण व व्याधी ह्यांची अवस्था जाणून मग वैद्य निर्णय घेतात. तसेच औषधी द्रव्यांमध्ये निंब, सारिवा, मंजिष्ठा, गुळवेल, हरडा, बेहडा, कुष्ठ, रक्तचंदन, हळद, जेष्ठमध वापरले जाते. औषधी कल्पामध्ये आरोग्यवर्धिनी, गंधक रसायन, चंद्रप्रभा, स्वयंभू गुगुळ, पंचातीक्त्‌क घृत गुगुळ इ. तसेच महामंजीष्ठादी काढा, सारीवाद्यासव, खादिरारीष्ट, शिरीशारीष्ट, उशिरासव, चंदनासव इ.चा वापर वैद्य करतात.
(वर सांगितलेली औषधे वाचकांनी वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत ही नम्र विनंती. देलेली औषधांची नावे ही फक्त आपल्या माहितीसाठी आहेत).
(क्रमशः)