मानवी मेंदूत चीप

0
29

मानवी मेंदूमध्ये संगणक चीप बसवण्यात एलॉन मस्कच्या न्यूरालिंक ह्या कंपनीला यश आल्याने सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर मानवी मेंदू आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सांगड घालण्याच्या दिशेनेही प्रयत्न होणे अटळ राहील आणि त्यामुळेच त्याच्या संभाव्यता लक्षात घेता ही चिंतेचीही बाब आहे. तूर्त ह्या प्रयोगामागे पक्षाघात झालेल्या माणसाच्या मेंदूमध्ये पुन्हा चेतना निर्माण करण्याचे, किंवा दृष्टिहीनांना दृष्टी देण्याचे किंवा ऐकू न येणाऱ्यांस श्रवणशक्ती देण्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हणजेच मानवकल्याणकारी उद्दिष्ट असल्याचे मस्क जरी सांगत असले, तरी प्रत्यक्षात भविष्यात ह्याचा वापर कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘ओप्पनहायमर’ चित्रपटामध्ये अणुबॉम्बच्या जनकाची कहाणी सांगण्यात आली होती. आण्विक संशोधनाने मानवाला ऊर्जाक्षेत्रात मोठी मदत झाली खरी, परंतु त्याचाच गैरवापर जपानमध्ये सर्वसंहारक हल्ल्यासाठी केला गेला होता. त्यामुळेच ह्या घटनेकडे थोडे सावधपणे पाहणे जरूरी असेल. मानवी मेंदूची संगणकाशी सांगड घालण्याचा हा काही पहिला प्रयोग नव्हे. यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. मोटर न्यूरॉन डिझिस नामक आजाराने हळूहळू सर्वांग लुळे पडलेले विख्यात संशोधक स्टीफन हॉकिंग यांच्या मेंदूची सांगड गुंतागुंतीच्या प्रक्रियेद्वारे संगणकाशी घातली गेली आहे, ज्यामुळे त्यांचे विचार संगणकनिर्मित ध्वनीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात हे उदाहरण तर सर्वविदित आहे. याहूनही आणखी वेगळे प्रयोग या क्षेत्रात झालेले आहेत. गेल्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये लुसान येथे एका पक्षाघाताच्या रुग्णाला त्याच्या मेंदूची आणि पाठीच्या कण्याची संगणकाशी जोड घालून देऊन इकॉल नामक कंपनीने केवळ मनातील चालण्याच्या विचाराने हातापायांना चालना देऊन वॉकरच्या मदतीने त्याला चालते करण्याचा चमत्कार घडवला होता. ऑस्ट्रेलियातील सिंक्रॉन ही कंपनीदेखील वैद्यकीय क्षेत्रासाठी अशा प्रकारचे प्रयोग करीत आली आहे आणि तिने दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे पेटंटही मिळवले आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी अशा प्रकारच्या संशोधनातून क्रांतिकारक गोष्टी घडू शकतात हे निर्विवाद आहे, परंतु केवळ तेवढ्यापुरता त्याचा उपयोग मर्यादित राहील ह्याची खात्री देणारी कोणतीही व्यवस्था नसल्याने जेव्हा व्यावसायिक पातळीवर अशी उत्पादने बाहेर पडतील, तेव्हा त्यांचा गैरवापर आणि दुरुपयोग होण्याची शक्यताही तितक्याच प्रमाणात बळावत जाईल. मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीने सध्या जे उत्पादन बनवले आहे, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला वायरची जोड देण्याचीही आवश्यकता नाही. ते वायरलेस आहे. शस्त्रक्रियेद्वारे ही संगणक चीप मानवी मेंदूत बसवण्यात आली आहे आणि तिच्यामुळे मेंदूतील न्यूरॉन्समध्ये हालचाल दिसत असल्याचा ह्या कंपनीचा दावा आहे. ‘टेलिपथी’ असे ह्या उपकरणाला त्यांनी यथार्थ नाव दिले आहे.
मानवी शरीराचे संचालन मेंदूद्वारेच तर होत असते. त्यामुळे मेंदूला धक्का पोहोचतो तेव्हा संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम होतात. त्यामुळे ह्या क्रांतिकारी उपकरणाचा प्रयोग जर यशस्वी झाला, तर त्यातून अनेक गोष्टी संगणकाच्या साह्याने साध्य करता येऊ शकतात. परंतु येथे एलॉन मस्कसारख्या लहरी अब्जाधीशाच्या हाती हे तंत्रज्ञान येऊ घातले आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. एलॉन मस्क यांच्या लहरीपणाचे दर्शन ट्वीटर प्रकरणात अवघ्या जगाला घडले. पैशाच्या बळावर अचाट आणि अफाट स्वप्ने साकार करण्याची त्याची सवय जगजाहीर आहे. त्यामुळे सारी नीतीमत्ता कोळून प्यालेल्या अशा व्यक्तीच्या हाती अशा प्रकारचे क्रांतिकारी तंत्रज्ञान जाणे कितपत योग्य अशी चर्चा संशोधनक्षेत्रात सुरू झाली आहे यात आश्चर्य नाही. मस्क यांच्या मालकीच्या सदर कंपनीत चारशे कर्मचारी सध्या काम करत आहेत. याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या दुसऱ्या कंपनीशीही मस्क यांच्या वाटाघाटी सुरू आहेत. म्हणजेच हे तंत्रज्ञान आपल्या हाती एकवटण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. घातक पदार्थांची वाहतूक केल्याबद्दल त्यांच्या कंपनीला या कंपनीला दंडही झाला होता आणि वैद्यकीय चाचण्यांत सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही तिच्यावर यापूर्वी केला गेला आहे. सध्या हे तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेत आहे, परंतु त्याच्या शक्यता मात्र अगणित आहेत. एएलएस किंवा पार्किन्सन्ससारख्या असाध्य आजारांवर उपचार करण्यात जर हे तंत्रज्ञान यशस्वी होणार असेल तर मानवाला त्याचा मोठा लाभ होऊ शकेल हे निर्विवाद आहे, परंतु आधीच अचाट असलेल्या मानवाच्या बौद्धिक क्षमतेला संगणकाधारित कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड दिल्याने काय घडू शकेल व ते विधायक असेल की विघातक हे मात्र आपण आज सांगू शकणार नाही.