दशकातील विकासकामांचे पंतप्रधानांसमोर सादरीकरण

0
4

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; सर्व सरकारी खात्यांसोबत घेतली फेरआढावा बैठक

राज्यातील भाजप सरकार आपण गेल्या 10 वर्षांत केलेल्या विकासकामांचे सादरीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्यावेळी त्यांच्यासमोर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 6 फेब्रुवारी रोजी गोव्यात आगमन होत असून, त्यादिवशी मडगाव बसस्थानकावर त्यांच्या एका भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधानांच्या सभेसाठीच्या तयारीचे काम पाहणाऱ्या सर्व सरकारी खात्यांची फेरआढावा बैठक घेतली.

6 फेब्रुवारी रोजी होणार असलेल्या ह्या जाहीर सभेतून ‘विकसित भारत, विकसित गोंय-2047’चे दर्शन जनतेला घडवण्यात येणार आहे. यावेळी राज्यातीला भाजप सरकार आपण गेल्या 10 वर्षांत केंद्रातील भाजप सरकारच्या मदतीने राज्यात जो विकास साधला, त्याचे सविस्तर सादरीकरण ह्या जाहीर सभेतून करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

सरकारने राज्यात केलेले महामार्गांचे बांधकाम व ठिकठिकाणी विणलेले अन्य रस्त्यांचे जाळे, राज्यात उभारण्यात आलेले पूल व फ्लायओवर तसेच राज्यात उभारण्यात आलेल्या अन्य साधनसुविधा, तसेच केंद्राच्या आत्मनिर्भर भारत योजनेखाली राज्यात सुरू केलेली स्वयंपूर्ण गोवा योजना, गरीब व दुर्बल घटकांसाठी सुरू केलेल्या अन्य योजना आदींचे सविस्तर असे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे.

भाजप आमदार व मंत्री यांनी आपापल्या मतदारसंघातून हजारो लोकांना सभेसाठी आणण्याची तयारी सुरू केलेली आहे. संपूर्ण गोव्यातूनह्या सभेसाठी लोक येणार असले तरी प्रामुख्याने दक्षिण गोव्यातून मोठ्या संख्येने लोकांना आणण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत आहे.

काँग्रेस पक्षाने मागच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजपचा पराभव केला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. काणकोण, केपे, सांगे, कुडचडे, मुरगाव, वास्को आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने लोकांना सभेसाठी आणण्यास भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी सध्या तीन नावांची चर्चा आहे. दिगंबर कामत, बाबू कवळेकर व नरेंद्र सावईकर या तीन नेत्यांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार असल्याची चर्चा आहे.

मडगाव बसस्थानकाचे आज स्थलांतर; भव्य मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर
मडगाव येथील कदंब बसस्थानकावर पंतप्रधानांची जाहीरसभा होणार असून, त्यासाठीची पूर्वतयारी सध्या जोरात सुरू आहे. मडगाव कदंब बसस्थानकाचे त्यासाठी गुरुवार दि. 1 ते गुरुवार दि. 8 फेब्रुवारी या कालावधीत तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. सभास्थानी भव्य मंडप उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे. दरम्यान, या सभेला 50 हजार लोक उपस्थित असतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.