माध्यम प्रश्नी भाजप नेत्यांचे राष्ट्रीय अध्यक्षांना साकडे

0
81

>>संघाशी सामोपचाराने तोडगा काढण्याची अमित शहांची ग्वाही

शैक्षणिक माध्यम प्रश्नावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील सौहार्दाचे संबंध अबाधित ठेवण्यासाठी सामोपचाराने तोडगा काढण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल पक्षाच्या गोव्याच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती या शिष्टमंडळातील एका नेत्याने दिली. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या सध्याच्या आंदोलनाचा भाजपवर परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला शहा यांनी या शिष्टमंडळाला दिला आहे.

काल सकाळी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर व उपाध्यक्ष दत्ता खोलकर यांनी श्री. शहा यांची भेट घेऊन गोव्याच्या माध्यम प्रश्नाची पार्श्वभूमी त्यांना विशद केली.
शैक्षणिक माध्यमाच्या प्रश्नावर राज्यात प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप विरोधात सुरू असलेल्या लढाईची माहिती या पक्षनेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना दिली. राज्यातील इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना दिलेले अनुदान रद्द केल्यास त्याचा सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकेल असा अहवालही पक्षातर्फे श्री. शहा यांना सादर करण्यात आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील विविध महत्त्वाच्या विषयांचा उहापोह पक्षाध्यक्ष श्री. शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत झाल्याच्या वृत्तास दक्षिण गोव्याचे खासदार श्री. नरेंद्र सावईकर यांनी दुजोरा दिला. आगामी निवडणुकीच्या संदर्भात विविध विषयांवर पक्षाध्यक्षांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. गोव्याच्या शिष्टमंडळाची ही भेट जवळजवळ पंचवीस मिनिटे चालल्याचे त्यांनी सांगितले.
रा. स्व. संघ व भाजप यांच्यातील मतभेद हा नाजूक विषय असल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हा प्रश्न कसा सोडविणार यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे.