माथेफिरू बापाकडून होंड्यात मुलीचा निर्घृण खून

0
108

>>दुसरी मुलगी गंभीर; घटनेनंतर पोलिसांसमोर शरणागती

 

होंडा – तिस्क येथे पेट्रोलपंपाजवळ काल दुपारी २.३० च्या सुमारास जन्मदात्या पित्याने आपल्या मुलींवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सुजाता रेड्डी (वय २०) ही मोठी मुलगी जागीच ठार झाली असून दुसरी लहान मुलगी मॉंगौरी (वय १७) ही गंभीर जखमी झाली आहे. माथेफिरू बापाचे नाव शंकर रेड्डी असून शरणागती पत्करल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रेड्डी कुटुंबीय मूळचे आंध्र प्रदेश येथील आहे. थरकाप उडवणार्‍या या घटनेमुळे होंड्यात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी शंकर रेड्डी याने धारदार कोयत्याने आपल्या दोन्ही मुलींवर हल्ला चढवला. प्रथम त्याने लहान मुलीच्या हातावर तसेच डोक्यावर कोयत्याने वार केले. त्या हल्ल्यात मॉंगौरीच्या हाताची बोटे कापली. ती बापाच्या तावडीतून कशीबसी सुटून गंभीर अवस्थेत घराबाहेर पळाली. लहान मुलगी घराबाहेर पळताच माथेफिरू बापाने मोठी मुलगी सुजाताकडे मोर्चा वळविला. शंकरने सुजाताच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार केल्याने ती जागीच गतप्राण झाली. सुजाताचा खून केलेल्या खोलीत रक्ताचा सडा पडला होता.
एका मुलीला ठार करून दुसरीला गंभीर केल्यानंतर शंकरने सरळ होंडा येथील पोलीस आउट पोस्टवर जाऊन खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन या घटनेची माहिती वाळपई पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
शंकर रेड्डी हा व्यवसायाने रंगकाम असून तो कुटुंबीयासह होंडा – तिस्क येथे भाड्याच्या घरात राहत होता. मयत सुजाता ही १२ वी पास होती. तिने डी. एड्. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. गंभीर असलेली मॉंगौरी शाळेत शिकते. त्यांची आई कालच आपल्या मूळ गावी आंध्र प्रदेश येथे गेली होती. ही संधी साधून त्याने आपल्या पोटच्या गोळ्यांचा काटा काढण्याचा बेत आखला असावा असा संशय आहे.
गुन्हेगारी पार्श्‍वभूमी
आपल्या मुलीला ठार करणार्‍या खुनी शंकर रेड्डी याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याच्याविरुद्ध वाळपई पोलिसांत अनेक गुन्हे नोंद आहेत. एका गुन्ह्याप्रकरणी तो तुरुंगवासही भोगून आला आहे. आपल्या बायकोला मारहाण केल्याप्रकरणी त्याला यापूर्वी सहा महिन्यांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता.
पोलीस अधिकारी दाखल
दरम्यान, होंडा येथे ज्या ठिकाणी खून झाला त्या ठिकाणी उत्तर गोवा अधीक्षक उमेश गावकर, डिचोली उपअधीक्षक रमेश गावकर यांनी भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. पोलिसांच्या विशेष पथकाने येऊन सबळ पुरावे गोळा केले.

शिक्षणासाठी पैसे मागितल्याने हल्ला
बापाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून सुदैवाने लहान मुलगी मॉंगौरी ही बचावली. तिची प्रकृती गंभीर असून बांबोळीतील गोमेकॉत तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत वडिलांकडे शैक्षणिक प्रवेशासाठी पैसे मागितल्यामुळे चिडून बापाने हल्ला केल्याचे म्हटले आहे. तिच्या या जबानीमुळे पोलीस तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत.

रागाच्या भरात खून
आपल्या मुलीबरोबर बोलण्यासाठी दररोज एक मुलगा यायचा. त्यामुळे आपणास आपल्या मुलीची वागणूक पसंत नव्हती. काल दुपारीही तो आला होता. त्याविषयी मुलीला जाब विचारला असता मुलीने मलाच उलट उत्तर दिले. त्यामुळेच आपण रागाचा भरात मुलीचा खून केला असे आरोपी शंकर रेड्डी याने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले आहे. याप्रकरणी वाळपई पोलीस अधिक तपास करीत आहेत.