मातेसह दीड वर्षाच्या मुलाला काळाने हिरावले

0
45

>> तोरसे येथे कंटेनर व कारमध्ये अपघात; एक महिला गंभीर जखमी;
>> मुलीसह वडील सुदैवाने बचावले; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा कायम

राज्याच्या विविध भागांत अधूनमधून अपघातांची मालिका सुरूच असून, काल दुपारी तोरसे-पेडणे येथे भीषण अपघात घडला. तोरसेतील सरकारी हायस्कूलसमोरील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि मासळीवाहू कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात आईसह दीड वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला. कारमधील अन्य एक महिला गंभीर जखमी झाली, तिच्यावर बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. या अपघातातून ७ वर्षीय मुलीसह तिचे वडील सुदैवाने बचावले.

मळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील पियुष गुंदेचा (३२) हे त्यांची पत्नी अपूर्वा गुंदेचा (३२), मुलगा आव्यान (दीड वर्ष), मुलगी मायरा (७) आणि एक मोलकरीण महिला यांच्यासह आपल्या कार (क्र. एमएच-१२-टीएस-८७८०) ने गोव्यात पर्यटनासाठी येत होते. तोरसे येथील सरकारी हायस्कूलसमोरील राष्ट्रीय महामार्गावर दुपारी बाराच्या सुमारास त्यांची कार पोहोचली असता समोरून येणार्‍या मासळीवाहू कंटेनर (क्र. केएल-१०-एझेड-८०९६) ची धडक त्यांच्या कार बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, त्यात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. जोरदार धडक बसल्याने अपूर्वा गुंदेचा आणि आव्यान यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पेडणे पोलीस आणि मोपा विमानतळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पेडणे अग्निशामन दलाचे जवान देखील घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृत व जखमींना कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कारचा अक्षरश: चेंदामेंदा झालेला असल्याने त्यातून मृतांना आणि जखमींना बाहेर काढताना जवांनाना मोठे परिश्रम करावे लागले. मोपा विमानतळ पोलीस निरीक्षक महेश केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या अपघातात गुंदेचा यांच्या घरातील मोलकरीण महिला गंभीर जखमी झाली होती, तिला व इतरांना पोलिसांच्या वाहनातून इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. या अपघाताची भीषणता पाहता केवळ दैव बलवत्तर म्हणून पियुष गुंदेचा आणि त्यांची मुलगी मायरा हे दोघे बचावले.

राष्ट्रीय महामार्गाचे ज्या दिवसापासून काम सुरू झाले, त्या दिवसापासून या तोरसे हायस्कूल परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. अनेकांचे बळी महामार्ग कंत्राटदाराने घेतल्याचा आरोप घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी केला.तोरसे सरकारी हायस्कूलसमोर हा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. कंत्राटदाराने या रस्त्यावर कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत, तसेच धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत. मधोमध रस्ता खणून ठेवलेला आहे. शिवाय हायस्कूलकडे जाणारा रस्ता अर्धवट स्थिती ठेवला आहे. दोन्ही बाजूला संरक्षण कठडेही बांधण्याचे सौजन्यही आजपर्यंत कंत्राटदाराने दाखवले नसल्याने नागरिकांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी तोरसेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर यांनी कंत्राटदाराच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. रस्ता कंत्राटदाराने हलकर्जीपणाचा कळस गाठलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेकांचे या ठिकाणी बळी गेले आहेत.

अनेक वेळा या धोकादायक स्थितीतील रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. शिवाय दोन्ही बाजूला संरक्षण कठडे बांधण्यात यावी अशी सूचना केली होती; परंतु या कंत्राटदाराने आजपर्यंत कोणत्याच सूचनांचे पालन न केल्याने अनेकांचे बळी जात आहे. आता सरकारने जोपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत २४ तास या रस्त्यावर वाहतूक पोलीस तैनात करावे, अशी मागणी सूर्यकांत तोरस्कर यांनी केली.

एक तास उलटल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी
ही घटना घडल्यानंतर जखमींना वेळीच आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली असती, तर कदाचित आई व मुलगा या दोघांचा जीव वाचला असता; मात्र अपघात घडून एक तास उलटल्यानंतर १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली; परंतु तत्पूर्वीच आई आणि दीड वर्षाचा मुलगा ठार झाला होता.

मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतरही रस्ता जैसे थे
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, तत्कालीन साबांखामंत्री दीपक पावस्कर आणि रस्ता विभागाच्या अधिकार्‍यांसोबत या रस्त्याची पाहणी केली होती. त्यावेळी रस्त्याचे व्यवस्थित रुंदीकरण करावे, सूचनाफलक लावावेत, अशा सूचना कंत्राटदाराला करण्यात आल्या होत्या; मात्र कंत्राटदाराने आतापर्यंत सरकारच्या सूचनांचे पालन न करता मनमानी कारभार चालवला आहे. परिणामी हा रस्ता आजही धोकादायक स्थितीत आहे, त्याबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

स्थानिक आमदारांच्या सूचनांचाही विसर
सहा महिन्यांपूर्वी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही या रस्त्याची अधिकार्‍यांसोबत पाहणी करून तोरसे हायस्कूलकडे जाणारा रस्ता व्यवस्थित करावा, संरक्षण भिंत व्यवस्थित बांधावी, दिशादर्शक फलक लावावेत, धोकादायक वळण कमी करावे, अशी सूचना अधिकार्‍यांना केल्या होत्या; मात्र त्याचाही अधिकार्‍यांना विसर पडलेला आहे.