माणसांचं जग- ४५ वैजीण ः कुरकेल माय

0
170
  • डॉ. जयंती नायक

 

ती म्हणे हातखड्याची वैजीण होती. तिनं कितीतरी कठीण बाळंतपणं सोडवली होती. त्या दिवशीसुद्धा पार्तेलीनं म्हणे आईची आशा सोडली होती, परंतु कुकरेल मायनं मात्र हिंमत सोडली नव्हती…

गावात सगळीजणं तिला ‘वैजीण माय’ म्हणून हाक मारायची. मी पण तिला त्याच नावाने हाक मारायची. पण तिचं खरं नाव कुरकेल होतं, हे मला खूप उशिरा कळलं. तिच्याविषयी माझ्या मनात लहानपणापासूनच

आदर होता. माझ्या स्मरणातली तिची पहिला आठवण आहे ती माझ्या धाकट्या भावाच्या जन्मावेळची.

मी त्यावेळी सुमारे दहा वर्षांची होते. आईचं बाळंतपण घरीच व्हायचं होतं. ती हॉस्पिटलात जायला कशीच तयार नव्हती. तिसर्‍या अपत्यानंतर सात वर्षांनी आलेलं तिचं हे बाळंतपण होतं. ती दोन दिवस अडली होती.

घरी पार्तेल बस्तान मांडून होती. शेजारच्या वयस्क बायकांचं घरी येणं-जाणं चाललं होतं. खोलीच्या आतून आईचं कण्हणं कानावर येत होतं. पणजी, वडील, आजोबा- सगळ्यांचे चेहरे गंभीर बनले होते. माझं वय असं की मला थोडं समजत होतं, तर थोडं समजत नव्हतं. आईच्या जिवाला धोका आहे हे मला समजलं होतं. मी रडवेली होऊन एका कोपर्‍यात बसले होते. आईचं कण्हणं जास्तच वाढलं अन् मला मोठ्यानं रडू फुटलं. मी कितीतरी वेळ रडत होते…

बर्‍याच वेळानं एका वयस्क मायेच्या हातानं मला जवळ ओढलं. माझ्या पाठीवर हात फिरवीत मला समजावलं. ती होती कुरकेल माय. ती म्हणाली, ‘‘बाय, रडू नकोस. तुझी आई बरी आहे… अन् तुला एक छानसा भाऊ मिळाला आहे. सायबीण मायनं तुमच्या आईला राखलं!’’

तिचा तो मायेचा स्पर्श मला अजूनही आठवतो. घरात शेजारपाजारच्या आणखीही बायका होत्या, पण कुणालाच मला आवरावंसं वाटलं नाही. परंतु आत खोलीत पार्तेलीला मदत करताना कुरकेल मायनं माझं स्फुदन ऐकलं अन् आईची सुटका होताच ती लगेच बाहेर आली.

ती ख्रिस्ती होती, शिवाय बाळंतखोलीत वावरत होती म्हणून मग मला पणजीनं डोक्यावरून आंघोळ करायला लावली. परंतु पणजीनंसुद्धा मला थोपटलं नाही.

त्यानंतर कुरकेल मायची अकरा दिवसपर्यंत आमच्या घरात ये-जा होती. सटीच्या दिवशी तर ती रात्रभर जागत बसली होती. त्या दिवसांत अन् नंतरही ती माझ्याशी खूपच मायेनं वागायची. माझी विचारपूस करायची. मला उद्देशून आईला म्हणायची, ‘‘आईच्या वेदना मुलीलाच समजतात गं, मुलांना नाही!’’

कातडीच्या आतील धमण्या दिसाव्यात असा मुलायम, गोरा रंग. लांब, पण ताठ बांधा. निळे डोळे. त्यावेळी ती साठीत पोहोचली असेल, परंतु तिचे केस मात्र काळे कुळकुळीत होते. ते दाट अन् लांब असावेत, कारण

तिच्या मानेवर केसांचा भला मोठा अंबाडा दिसायचा. ती निळ्याशार रंगाचं, चिटाचं लुगडं न्हेसायची. त्यावर पांढर्‍या रंगाचं पोलकं घालायची. तिच्या गळ्यात एक बेतीन तेवढं असायचं. कान उगडे, हातांत

निळ्या रंगाच्याच बांगड्या. कधीकधी ती पाठीवर पांढर्‍या रंगाची ओल घ्यायची.

मी जसजशी मोठी होत गेले, तसतशा मला कुकरेल मायसंबंधी खूप गोष्टी समजल्या. ती म्हणे हातखड्याची वैजीण होती. तिनं कितीतरी कठीण बाळंतपणं सोडवली होती. त्या दिवशीसुद्धा पार्तेलीनं (सरकारी नर्स)

म्हणे आईची आशा सोडली होती, परंतु कुकरेल मायनं मात्र हिंमत सोडली नव्हती. आईचं सुखरूप बाळंतपण तिच्याचमुळे झालं होतं. ती हे सगळं विनामूल्य करायची. एक ‘मानाची पड’ (तांदूळ, नारळ आदीचे ताट) तेवढी

घ्यायची.

माझी आई तिला त्या घटनेपासून देवीच्या जागी मानायची. घरात काही उत्सवकार्य असेल तर तिला आवर्जून जेवायला बोलवायची. काही कारणास्तव ती आली नाही तर तिला घरी ‘पान’ पाठवून द्यायची.

तशी कुकरेल माय सुखवस्तू घराण्यातील होती. तिचा नवरा जहाजावर नोकरी करीत होता. घरची शेतीभाती होती. सासूच्या आधारानं ती शेती करायची. सासूकडूनच तिला वैजीणपणाचे धडे मिळाले होते. त्याचबरोबर

लहान मुलांच्या आजारावर औषधे देण्याचा वारसा पण तिला मिळाला होता.

कुरकेल माय गावच्या ख्रिस्ती धालो मांडाची मांडकान्न पण होती. गावच्या कपेलानजीक म्हणे ख्रिस्तींच्या धालांचा मांड होता. पूर्वी दरवर्षी म्हणे तिथे ऑक्टोबर महिन्यात धालो व्हायच्या. खरं तर हा मांड आमच्या घराजवळच, परंतु लहानपणी मी या विषयापासून दूर असल्याने मी त्या कधी बघितल्या नाहीत.

मात्र म्हैसूरहून लोकवेदाची पी.जी. करून आल्यावर जेव्हा मी गावच्या लोकसंस्कृतीचा ठेवा जतन करण्याच्या कार्याला लागले तेव्हा तिच्या सुनेनंच मला सांगितलं, ‘‘आमच्या मायला धालांची खूप गाणी माहीत होती. मांड बंद पडला तरी ती बसून गायची. आता वय झालं आहे तिचं. विसर पडत आहे सगळ्याचा. तरी बघ तू प्रयत्न करून.

मी लगेचच तिला भेटायला गेले. तेव्हा तिने वयाची ऐंशी ओलांडली होती. आपल्या स्मृतीला ताण देऊन तिनं एकूण नऊ गीतं तुटकतुटकपणे माझ्यासाठी गायली, जी मी ‘माझ्या रथा तुज्यो घुडयो’ या धालोगीतांच्या संकलनात समाविष्ट केलेली आहेत.

मी तिच्याकडं गीतं विचारायला आली याचा तिला कोण आनंद! तिच्या चेहर्‍यावर ओसंडलेला तो आनंद आणि तत्मय स्वर मला अजूनही आठवतो. ती गात होती…

दाया हाती पाच बोटां, उजया हाती घंगर इळो,

पाकळ लिवता गा मामा, पाकळ लिवता गा

देवा सारकें बाळ जालां

दुदा वयता गा मामा, दुदा वयता गा…