माजी सभापती अनंत शेट यांचे निधन

0
203

गोव्याचे माजी सभापती अनंत शेट (५८) यांचे रविवारी पहाटे ३च्या सुमारास गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. काही दिवसांपूर्वी आंघोळ करीत असताना न्हाणीघरात घसरून पडले होते. त्यानंतर त्यांना गोमॅकोत उपचारासाठी दाखल केले होते. मात्र सात दिवसानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. काल दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत मये मतदारसंघातून ते विजयी झाले होते. २०१७ मधील निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली, परंतु ते पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करीत राहिले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपसभापती मायकल लोबो, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह राजकीय नेते, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शेट यांचे शेकडो कार्यकर्ते यांनी अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मान्यवरांची श्रध्दांजली
लोककल्याणकारी नेता : राज्यपाल
राज्यपाल सत्य पाल मलिक यांनी माजी सभापती अनंत शेट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी वाहिले. समाजसेवेसाठी असलेले त्यांचे कौशल्य कायम स्मरणात राहील.

अनुभवी नेता गमावला : मुख्यमंत्री
अनंत शेट यांच्या निधनाने भाजपने अनुभवी नेता व आदर्श माणूस गमावला आहे. त्यांचे गोव्याच्या राजकारणात तसेच समाजकारणात मोठे योगदान होते.

आदर्श सभापती : पाटणेकर
अनंत शेट हे आदर्श नेते होते. आदर्श सभापती म्हणूनही त्यांचे योगदान मोठे आहे.

मयेच्या विकासात वाटा : नाईक
अनंत शेट यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक आदर्श नेता गमावला असून त्यांनी गोव्याच्या तसेच मये मतदारसंघाच्या विकासात मोठे योगदान दिले, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.

शेट यांच्या निधनाने धक्का : राणे
अनंत शेट यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून धक्काच बसल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले. एक शांत व्यक्तीमत्त्व आणि समाजसेवक आपण गमावल्याचे ते म्हणाले.