माजी संपादक सुरेश वाळवे यांचे निधन

0
13

मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त; 22 वर्षे ‘नवप्रभा’चे संपादक म्हणून कार्य; अग्रलेखांसाठी होते प्रसिद्ध

36 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारे दै. ‘नवप्रभा’चे माजी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश रामकृष्ण वाळवे (76) यांचे काल दुपारी त्यांच्या व्हाळशी-डिचोली येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले सुरेश वाळवे यांनी दैनिक ‘नवप्रभा’चे संपादक म्हणून 22 वर्षे काम केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. काल सायंकाळी उशिरा पाचवाडा-डिचोली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, धेंपो उद्योगसमूहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो, ‘नवहिंद’ पब्लिकेशन्सच्या कार्यकारी संचालक पल्लवी धेंपो, दैनिक ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, गोवा श्रमिक पत्रकार संघटना (गुज) आणि गोवा छायापत्रकार संघटनेनेही दु:ख व्यक्त केले आहे.

आपल्या व्हाळशी-डिचोली येथील जन्मगावी त्यांनी अनेक सेवाभावी प्रकल्प राबवले. व्हाळशी गावात ते ‘दाजी’ या नावाने प्रसिद्ध होते. त्यांना भतग्राम भूषण पुरस्कारासह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. याशिवाय सुरेश वाळवे हे अग्रलेखांसाठी प्रसिद्ध होते. त्यांचे अग्रलेख हे आवर्जून वाचले जायचे.

ज्येष्ठ पत्रकार म्हणून देशातील काही पंतप्रधानांच्या बरोबर सुरेश वाळवे यांनी परदेश दौरे केले होते. ‘नवप्रभा’बरोबरच दैनिक राष्ट्रमतमध्येही त्यांनी काम केले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे मीडिया सल्लागार म्हणूनही काम पाहिले.

सुरेश वाळवे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये आणि माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी दुःख व्यक्त केले. डिचोली पत्रकार संघातर्फे वाळवे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला व श्रद्धांजली वाहण्यात आली.
पत्रकारिता, राजकीय, सामाजिक, शिक्षण व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच व्हाळशी ग्रामस्थांनी सुरेश वाळवे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू यांच्याकडून शोक व्यक्त
सुरेश वाळवे यांचे जाणे ही गोमंतकीय पत्रकारितेची खूप मोठी हानी आहे. गोमंतकीय पत्रकारितेत गोमंतकीय संपादक म्हणून त्यांनी असंख्य लेखकांना लेखनासाठी प्रेरणा दिली. अनेक लेखक त्यांनी घडवले. वाळवे यांचे अग्रलेख वैशिष्ट्यपूर्ण होते. अत्यंत नर्मविनोदी अशी शैली त्यांना लाभली होती. त्यांच्या अग्रलेखाचा खास असा वाचकवर्गही होता. अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचे अग्रलेख आणि लोकप्रिय संपादक अशी त्यांची ख्याती होती. मी वाळवे यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतो. त्यांनी आमच्या सारख्या पत्रकारांना स्वच्छ व प्रामाणिक पत्रकारितेची प्रेरणा आपल्या आयुष्यभराच्या योगदानातून दिली. ती यापुढेही गोमंतकीय पत्रकार स्मरणात ठेवतील, अशा शब्दांत दैनिक ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दोन दशके वाहिली संपादकपदाची धुरा
पणजी (न. प्र.) : ज्येष्ठ पत्रकार व दै. नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे यांचे काल निधन झाले. आपल्या पत्रकारितेचा श्रीगणेशा दै. राष्ट्रमतमधून केलेल्या सुरेश वाळवे यांनी दै. नवप्रभाचे संपादक म्हणून तब्बल 22 वर्षे काम पाहिले. आपल्या 36 वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्यांना पत्रकारितेसाठीचे कित्येक पुरस्कार लाभले. त्यात अण्णा फणसे पत्रकारिता पुरस्कार मडगाव (1996), प्रागतिक विचार मंच पत्रकारिता पुरस्कार बोरी (1998), गो. मराठी अकादमीचा ‘भारत’कार गो. पु. हेगडे देसाई पत्रकारिता पुरस्कार, पुण्याच्या महाराष्ट्र जर्नालिस्टस्‌‍ फाऊंडेशनचा भास्कर पुरस्कार (2007), लक्ष्मीकांत बोरकर पत्रकारिता पुरस्कार बोरी (2017) या पत्रकारिता पुरस्कारांबरोबरच त्यांना दलित संघटनेचा दलितमित्र पुरस्कार, डिचोली बचाव अभियानचा भतग्राम (लेखन) कला पुरस्कार, पणजी लायन्स क्लबचा प्रॉमिनंट सिटिझन पुरस्कार असेही पुरस्कार लाभले.

खुसखुशीत अग्रलेख
जनमानसात सुरेश वाळवे यांची ओळख ही खुसखुशीत अग्रलेख लिहिणारे संपादक अशी होती. आणि गोव्यात त्यांच्या अग्रलेखांचा एक खास असा वाचकवर्ग होता. दिग्गज व सुप्रसिद्ध अशा व्यक्तींवर लिहिलेले त्यांचे मृत्यूलेखही (अग्रलेख) वाचकांच्या पसंतीस उतरत असत. निवृत्तीनंतर त्यांनी साहित्यलेखनही केले होते. त्यात त्यांच्या ‘सरळवाट’ ह्या आत्मचरित्राचाही समावेश आहे.

अनेक पदांवर केले काम
निवृत्तीनंतर सुरेश वाळवे यांनी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे पत्र संपर्काधिकारी म्हणूनही काही काळ जबाबदारी सांभाळली होती. त्याशिवाय कित्येक संस्थांचे पदाधिकारीही म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यात डिचोली येथील बिचोलीम अर्बन का. ऑपरेटिव्ह बँक लि.चे नियुक्त संचालक, गोवा मराठी पत्रकार संघ पणजीचे अध्यक्ष, मुंबई दूरदर्शन सल्लागार समितीचे सदस्य, गोवा दूरध्वनी सल्लागार समिती पणजीचे सदस्य, गोवा सरकारच्या चित्रपट पटकथा परीक्षण समितीचे सदस्य, गोवा सरकारच्या पत्रकार अधिमान्यता समितीचे अध्यक्ष, गोवा श्रमिक पत्रकार संघटना पणजीचे उपाध्यक्ष, इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट दिल्लीच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य, पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्र उदयपूर-राजस्थानचे सदस्य, गोवा एडिटर्स गिल्ड पणजीचे कोषाध्यक्ष या संस्थांचा समावेश होता.

अनेकांना दिली लेखनाची संधी
दै. ‘नवप्रभा’च्या संपादकपदाच्या आपल्या कारकिर्दीत सुरेश वाळवे यांनी पत्रकार म्हणून छाप सोडताना या दैनिकाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचे काम केले. यादरम्यान त्यांनी कित्येक लेखकांना लिहिण्याची संधी देऊन त्यांचे लेख व अन्य साहित्य नवप्रभातून प्रसिद्ध केले. रविवारच्या पुरवणीत गोव्यातील दिग्गज अशा साहित्यिकांची सदर सुरू होती. त्यात रवींद्र केळेकर यांचे ‘स्वगत’, दिलीप बोरकर यांचे ‘जिमलेट’, जयराम कामत यांचे ‘गुलमोहर’ ही गाजलेली सदरे सुरू केल्याचे श्रेय हे सुरेश वाळवे यांना जात असल्याच्या प्रतिक्रिया काल राज्यातील कित्येक लेखक व साहित्यिकांनी दिल्या.

ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांनी पन्नास वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत आपला आगळावेगळा ठसा निर्माण करताना गोव्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकला. व्हाळशी गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवताना त्यांनी गावात वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या. त्यांच्या निधनामुळे गोवा एका अनुभवी पत्रकाराला मुकला आहे.

  • डॉ. चंद्रकांत शेट्ये,
    आमदार, डिचोली

सुरेश वाळवे यांच्या निधनामुळे गोवा एका ज्येष्ठ अनुभवी पत्रकार आणि लेखकाला मुकला असून, त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात दिलेले योगदान असामान्य असे आहे. आपल्या लेखणीतून सरकारला जागे करण्याची ताकद त्यांच्यात होती. आगळीवेगळी लेखन शैली आणि परखड मते मांडत असताना राज्याच्या जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले.

  • ॲड. रमाकांत खलप,
    माजी केंद्रीय मंत्री