मांद्य्रात लवकरच नवे पोलीस स्थानक

0
0

मुख्यमंत्र्यांची घोषणा; म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे उद्घाटन

पेडणे तालुक्यातील मांद्रे येथे नवीन पोलीस स्थानक सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हार्दोळ पोलीस स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना काल केली.
राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे. गोव्यात होणाऱ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये परप्रांतीयांचा समावेश असतो. त्यामुळे परराज्यातील लोकांना खोली, घर भाडेपट्टीवर देण्यापूर्वी त्या लोकांची सविस्तर माहिती घेऊन पोलिसांकडून माहितीची पडताळणी करून घेतली पाहिजे. स्थानिक लोकांमध्ये काही वेळा मालमत्ता, कौटुंबिक वादातून भांडणे होतात. मोठे गुन्हे केले जात नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मागील चार वर्षांत कोलवाळ येथे नवीन पोलीस स्थानक सुरू करण्यात आले आहे. आता, फोंडा तालुक्यात दुसरे पोलीस स्थानक सुरू करण्याची मागणी अखेर मार्गी लावण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोवा पोलीस गुन्ह्यांचा छडा लावण्यास देशात आघाडीवर आहेत. पोलीस यंत्रणेकडून विद्यार्थी, नागरिकांत जनजागृती घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. सायबर गुन्ह्याबाबत नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे. परकी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती देता कामा नये, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी कला व संस्कृतीमंत्री, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, पोलीस महासंचालक जसपाल सिंग व इतरांची उपस्थिती होती. म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक म्हणून मोहन गावडे यांची नियुक्ती करण्यात आलेली
आहे.