
>> एटीपी क्रमवारीत फेडररचे अव्वलस्थान कायम
स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानावरील आपल्या ३०४व्या आठवड्याला काल सुरुवात केली. दुबईतील स्पर्धेतून अंग काढून घेतल्यामुळे त्याला आपल्या खात्यात अजून काही गुण जमा करता येणार नाहीत.
दुसर्या स्थानावरील नदाल (९७६०) व अव्वल स्थानावरील फेडरर (१०१०५) यांच्यात ३४५ गुणांचे अंतर आहे. महिला एकेरीत रोमानियाच्या सिमोना हालेपने डेन्मार्कच्या कॅरोलिन वॉझनियाकीला मागे टाकून पहिला क्रमांक मिळविला आहे. मागील आठवड्यात झालेल्या दुबईतील स्पर्धेत या दोघांनी सहभाग नोंदविला नव्हता.
अकापुलको येथे सुरु झालेल्या मेक्सिकन ओपन स्पर्धेसाठी नदालला प्रथम मानांकन आहे. या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तरीसुद्धा नदाल फेडररला मागे टाकू शकणार नाही. यासाठी त्याला इंडियन वेल्स किंवा मायामीतील स्पर्धेपर्यंत वाट पहावी लागू शकते. क्रोएशियाचा मरिन चिलिच (४९६०) तिसर्या स्थानावर आहे.
अकापुलकोमधील स्पर्धेत तो सहभागी झालेला नाही. चौथ्या स्थानावर असलेला बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव (४६३५) व चिलिच यांच्यात ३२५ गुणांचे अंतर आहे. सध्या प्रगतीपथावर असलेल्या दुबई अजिंक्यपद स्पर्धेत दिमित्रोवला प्रथम मानांकन आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर आपल्या खात्यात ५०० गुण जमा करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या आलेक्झांडर झ्वेरेवला (४४५०) अकपुलकोमध्ये नदालनंतर दुसरे मानांकन मिळाले आहे. मोसमाची सुरुवात खराब झाल्यानंतर आपल्या गुणांत भर घालण्यासाठी तो मेहनत घेत आहे. रिओ दी जानेरोमधील आपल्या जेतेपदाचा यशस्वी बचाव करण्यात अपयश आलेला डॉमनिक थिएम (३८१०) सहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यातून काही गुण वजा झाले आहेत. डेव्हिड गॉफिन (३२८०) सातव्या, केव्हिन अँडरसन (२८२५) आठव्या, जुआन मार्टिन डेल पोत्रो (२७४५) नवव्या व जॅक सॉक (२६५०) दहाव्या स्थानी आहे. डब्ल्यूटीए क्रमवारीत गार्बिन मुगुरुझा तिसर्या क्रमांकावर आहे. इलिना स्वितोलिना हिचा चौथा क्रमांक कायम आहे.
डब्ल्यूटीए टॉप १० ः १. सिमोना हालेप (७९६५), २. कॅरोलिन वॉझनियाकी (७५२५), ३. गार्बिन मुगुरुझा (६१७५), ४. इलिना स्वितोलिना (५४८०), ५. कॅरोलिना प्लिस्कोवा (५०८०), ६. येलेना ओस्टापेंको (५०००), ७. कॅरोलिन गार्सिया (४६२५), ८. व्हीनस विल्यम्स (४२७७), ९. पेट्रा क्विटोवा (३०८०) १०. अँजेलिक कर्बर (३०५५)
रामकुमार रामनाथन १३३व्या स्थानी
रामकुमार रामनाथन याने एटीपी क्रमवारीत सात स्थानांची प्रगती साधताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम १३३वे स्थान मिळविले. पुरुष एकेरीतील भारताचा आघाडीचा खेळाडू असलेल्या युकी भांब्री याला मात्र चार स्थानांच्या नुकसान झाले आहे. तो १०५व्या स्थानी आहे. एटीपी डेलरे बीच ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेश केल्यामुळे २३ वर्षीय रामकुमारने १२ गुणांची कमाई केली. रामकुमारला या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराजित व्हावे लागले होते तर युकीला पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयश आले होते. युवा सुमीत नागल याची घसरण झाली असून चार स्थाने खाली सरकल्यामुळे तो २२०व्या स्थानी पोहोचला आहे. डावखुर्या प्रज्ञेश गुणेश्वरनने १० स्थानांची सुधारणा करत २३२व्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे. पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा (२०) भारताचा सर्वोत्तम स्थानावरील खेळाडू आहे. त्याच्यानंतर दिविज शरण (५४वे स्थान, -३) व लिएंडर पेस (५२वे स्थान, -३) यांचा क्रमांक लागतो. महिला एकेरीत अंकिता रैना (२५०) हिने पाच क्रमांकांची उडी घेतली आहे. करमन कौर थंडी २८१व्या स्थानी कायम आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेल्या सानिया मिर्झाने महिला दुहेरीत एका क्रमाने वर सरकताना १३वे स्थान मिळविले आहे.