
सायना नेहवालने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी.व्ही सिंधूवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सायनाने अनुभवाच्या जोरावर सिंधूला २-० ने नमवले. सायनाने आक्रमक खेळी करत पी. व्ही. सिंधूचा २१-१८, २३-२१ असा सरळ दोन गेममध्ये पराभव करत सुवर्ण आपल्या नावे केले. तर सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असून तिला रौप्यपदक मिळाले आहे.
भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंमधील सामना हा सुरुवातीपासूनच आक्रमक होता.
दोन्ही खेळाडूंमध्ये एका एका गुणासाठी कडवी झुंज पाहायला मिळाली. कधी सायना आघाडीवर तर कधी सिंधू आघाडीवर होती. पहिल्या गेममध्ये सायनाने २१-१८ अशा गुणांनी जिंकत आघाडी घेतली. तर पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूने दुसर्या सेटमध्ये सायनासोबत तुल्यबळ खेळ करत तिचा घामटा काढला. मात्र सायनाने अनुभवाच्या जोरावर सिंधूचा २३-२१ अशा फरकाने पराभव करत सामना जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले. सिंधूने उपांत्य फेरीमध्ये माजी विजेती मिशेल ली हिला २६ मिनिटांत २१-१८, २१-१८ ने पराभूत केले होते.
माजी अव्वल खेळाडू असलेल्या सायना नेहवालने अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठीच्या लढतीत ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेती क्रिस्टी गिलमोर हिला ६८ मिनिटांत २१-१४, १८-२१, २१-१७ ने मात दिली होती.
टेबल टेनिसमध्ये कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारताच्या अचंथा शरथ कमलने इंग्लंडच्या सॅम्युअल वॉकरचा चार गेममध्ये ११-७, ११-९,९-११, ११-६, १२-१० असा पराभव केला.
दीपिका-जोश्नाचे सुवर्णपदक हुकले
स्क्वॉशच्या महिला दुहेरीच्या सुवर्णपदकाने भारताला हुलकावणी दिली. अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या जोएल किंग व अमांडा लँडर्स मर्फी जोडीने भारताच्या दीपिका पल्लिकल व जोश्ना चिनप्पा यांना ११-९, ११-८ असे गारद केले.
के. श्रीकांत, रंकीरेड्डी-चिरागला रौप्य
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात किदांबी श्रीकांतला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या श्रीकांतला मलेशियाच्या जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर असणार्या ली चोंग वीने १९-२१, २१-१४, २१-१४ असे तीन गेममध्ये हरविले. हा सामना एक तास पाच मिनिटे रंगला.
सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इंग्लंडच्या मार्कुस एलिस व ख्रिस लँग्रिज यांनी भारतीय जोडीला २१-१३, २१-१६ असे पराभूत केले.