Home बातम्या महाशिवरात्रीनिमित्त हरवळे येथे भाविकांचा महापूर

महाशिवरात्रीनिमित्त हरवळे येथे भाविकांचा महापूर

0

मुख्यमंत्री तसेच राजकीय नेत्यांनी घेतले रुद्रेश्वराचे दर्शन

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानात महाशिवरात्री उत्सव काल रविवारी व आज सोमवारी असे दोन दिवस साजरा होत आहे. काल रविवारी पहाटेपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सौ सुलक्षणा सावंत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, रथोत्सव समितीचे अध्यक्ष दयानंद मांद्रेकर व पदाधिकारी देवस्थान व उत्सव समिती पदाधिकारी आजी-माजी मंत्री, आमदार, राजकीय नेत्यांनी दिवसभरात रुद्रेश्वराचे दर्शन घेतले.
महाशिवरात्री उत्सवनिमित्त पहाटे 1.30 वाजता मुक्तद्वार महापर्वणीला प्रारंभ झाला. पहिला अभिषेक देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पहाटे 3.00 वाजल्यापासून समस्त भाविकांतर्फे रुद्राभिषेक सुरू झाला. मुक्तद्वाराचा लाभ सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी घेतला. देवस्थान समिती तसेच प्रशासनाने उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, पोलीस निरीक्षक विजय राणे, मामलेदार शैलेंद्र देसाई, आदींनी नेटके नियोजन केले आहे.

मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक अभिषेक
सकाळी मुख्यमंत्र्यांनी पूजा करून अभिषेक केला व गोमंतकीय जनतेच्या सर्वांगीण उत्कर्ष सुख समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे सांगितले.
हरवळे येथे कोट्यावधी रुपये खर्च करून परिसराचे नूतनीकरण सुशोभीकरण आधुनिक सुविधा नियुक्त असा परिसर करण्यात येत असल्याने भाविकांची आगामी काळात मोठी सोय होणार असून 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
गोव्यातील रुद्रेश्वर देवस्थान हे प्रख्यात असून देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने आवर्जून या महापर्णीसाठी भाविक दर्शन घेतात. पर्यटनाच्या नकाशावर हरवळेचा धबधबा व देवस्थान प्रसिद्ध असून आगामी आठ-दहा महिन्यांत या परिसराचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. आधुनिक सुविधांनी युक्त परिसर हा जागतिक पर्यटकांचे आकर्षण केंद्र भक्तांसाठी एक उत्तम केंद्र ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.