महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा काल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने केली. कोरोना आपत्तीमुळे याआधी ३ एप्रिल रोजी व्हावयाची ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. आता ही निवडणूक होणार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेद्वारा निवडून येऊन विधीमंडळ कामकाजात सहभागी होणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल बी. एस. कोशयारी यांनी वरील निवडणुका घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पूर्ण मंडळाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा याविषयी निर्णय घेतला. त्यात अमेरिकेत असलेले मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा हेही सहभागी झाले. तसेच अशोक लवासा व सुशील चंद्रा हे दोन आयुक्तही सहभागी होते.