महाराष्ट्र कर्नाटकचे धरण आणि गोव्याचे मरण

0
119

– मधु य. ना. गांवकर, तामसुली – खांडोळा
महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून म्हादई किंवा मांडवी आणि जुवारी या दोन नद्यांचा उगम सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर होतो व निसर्गाने दिलेल्या वाटेतून वाकड्या तिकड्या वाहत त्या गोव्यातून अरबी समुद्राला मिळतात. या दोन नद्यांचा जन्म केव्हा झाला हे सत्य सांगणे आज महाकठीण आहे. अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. त्यानंतर काही युगांनी पश्‍चिम कोकण किनारपट्टीचा जन्म झाला. हळूहळू माणूस जीवन जगण्यासाठी नद्यांच्या काठाने वस्ती चढवत त्यांच्या काठावर शेती भाती करून राहू लागला. भूनंदनवन आपण ज्या काश्मीरला म्हणतो, त्याप्रमाणे गोमंतकाला सृष्टीसौंदर्य लाभले आहे. आमच्या पूर्वजांनी शेती – बागायती तयार करून पाचूची गोवा भूमी तयार केली.
१९४७ ते १९६१ सालापर्यंत गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांनी गोव्याला आपला लहान भाऊ मानून त्याला पारतंत्र्यातून सोडविण्यासाठी मोठे कष्ट घेतले व मदत केली. आमच्या स्वातंत्र्यसैनिकांना पोर्तुगीज सरकारविरुद्ध लढण्यासाठी रेडी, बांदा, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग, तळेखोल या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने स्वातंत्रसैनिकांच्या चौक्या उघडण्यास परवानगी दिली. तसेच कर्नाटक सरकारने जांबोटी, खानापूर, लोंढा, तिनईघाट, सदाशिवगड, कारवार या ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांच्या चौक्या उघडण्यास परवानगी दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लोकांनी गोवा मुक्त होण्यासाठी गोव्यातील सत्याग्रहात मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. हे त्यांचे उपकार गोव्यावर आहेत.
गोवा मुक्त झाल्यानंतर गोव्याची जनता शिकून शहाणी होण्यासाठी गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांनी शाळा काढून कारवार, खानापूर, बेळगाव, सावंतवाडी, वेंगुर्ला या ठिकाणाहून शिकलेली माणसे गोव्यात आणून गोव्याच्या मुलांना मराठीत शिक्षण मोठ्या प्रमाणात दिले. तसेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून अन्नधान्य व भाजीपाला, वीज पुरवून गोव्यावर मोठेच उपकार केले. त्यावेळी प्रत्येकाला वाटत होते की गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक हे तीन भाऊ, भारतमातेची लेकरे आहेत.
पण आमच्या सुसंस्कृत राजकारण्यांनी काळ आणि वेळही बदलून टाकली आहे. ज्या गोव्यात नैसर्गिकपणे कोट्यवधी वर्षांपूर्वीपासूनच मांडवी आणि जुवारी वाहते त्यांचे पाणी बंद करून गोव्यातील जनतेला व पर्यावरणाला मारून टाकण्याचे ठरविले आहे असे आज दिसू लागले आहे. कर्नाटक सरकार कणकुंबी, कळसा, भंडुरा, हलतरा, नरसे ह्या नाल्यांचे पाणी अडवून मलप्रभेत सोडून ७.५६ टी.एम.सी.फूट पाण्याची गरज पूर्ण करण्याबद्दल म्हादई जल लवादाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एस. पांचाळ, न्यायमूर्ती विनय मित्तल, न्यायमूर्ती टी. एस. नारायण या त्रिसदस्यीय समितीकडे मागणी करीत आहे. हल्ली तेच कर्नाटक सरकार म्हादई लवादाकडे आणखी ज्यादा चार टी.एम.सी. पाण्याची मागणी करीत आहे. तसेच काटला व पाळणा या दुधसागराच्या माथ्यावरील दोन लहान नद्यांचा प्रवाह वळवून दुधसागराचे पाणी बंद करण्याचा डाव खेळत आहेत.
महाराष्ट्र सरकार गोव्याच्या सीमेलगत विर्डी धरणाचे काम चालू करून कट्टीचा नाला या नाल्याचे पाणी अडवित आहे. ते पाणी वाळवंटीला येऊन मिळते. सदर पाणी बंद करण्याच्या तयारीत महाराष्ट्र सरकार आहे. विर्डी धरण म्हादईच्या तीन कि.मी. पर्यावरणीय क्षेत्रात येते. या धरणाच्या परिसरात महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून पर्यावरणाचा र्‍हास केला आहे आणि तिथली जंगली श्वापदे आसपासच्या गोवा, महाराष्ट्र सीमेवरील गावांत घुसून मोठ्या प्रमाणात भातशेती व बागायतीची नासधूस करीत आहेत.
आज भारताच्या पश्‍चिम घाटपट्‌ट्यात गोवा राज्यात म्हादई अभयारण्य, महावीर अभयारण्य, नेत्रावळी अभयारण्य आणि खोतीगाव तसेच बोंडला अभयारण्य ही वसलेली आहे. म्हादई/मांडवी आणि जुवारी या दोन नद्या अभयारण्याच्या परिसरातून वाहतात, दोन्ही नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात भातशेती आणि बागायती वसलेली आहे. या दोन्ही नद्यांचा पश्‍चिम घाटातून होणारा पाणी पुरवठा बंद झाला तर गोवा आणि गोव्याची जनता, हिंस्त्र प्राणी, पाळीव जनावरे, पक्षी, नदीतील मत्स्यधन, सरपटणारे प्राणी, कृमी कीटक यांचे हाल हाल होऊन तडफडून मरतील यात शंकाच नाही आणि गोव्याचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही.
तिन्ही राज्यांतील सरकारे चालविणारे पुढारी अखेर माणसेच आहेत. या तिन्ही राज्यांतील जनता आज एकमेकांच्या राज्यात सामील झाली आहेत. घरे बांधून गुण्या-गोविंदाने नोकरी-व्यवसायानिमित्त राहत आहे. त्यांच्यावर या तिन्ही राज्याच्या सरकारांनी ही वेळ आणू नये. आपण माणसांनी निसर्गाला अडविण्याचा कितीही जरी प्रयत्न केला, तरी स्वार्थी माणसाला ते शक्य नाही, हे निसर्गाने दाखवून दिले आहे. हल्लीची उत्तराखंडची दुर्घटना असो अगर जम्मू काश्मीरची असो, महाराष्ट्रातील माळीण गावची असो, अगर काणकोणची ढगफुटी, रूबी रेसिडेंसी प्रकरण असो. हे सांगायला कोण्या भविष्यकाराची गरज नाही.
मानव, सृष्टीचे सौंदर्य, पर्यावरणाचा र्‍हास करू शकत नाही. र्‍हास केला तर तो जगू शकत नाही. मग त्याच्याकडे कितीही श्रीमंतीचे धन असू दे. पर्यावरणाचा र्‍हास केल्याने क्लेश, दुःख, विपत्ती, छळ, यातना, दुष्काळ, मृत्यू, हे सारे ओढवून मात्र घेईल आणि पर्यावरणाचा सांभाळ केला तर जीवन, इच्छाशक्ती, उंची, अस्तित्वातील गोष्टी, भविष्यात घडणार्‍या चांगल्या घटना, पर्यावरणाचा सांभाळ केल्यास कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही, हे आपण जाणले पाहिजे. रेड्या – पाड्याची झुंज आणि झाडावर काळ अशी कोकणीत म्हण आहे. आज महाराष्ट्र आणि कर्नाटक कल्पवृक्षाच्या शेंडीप्रमाणे वरच्या भागात आहेत. पण त्यांना माहीत नाही की, एक दिवस कल्पवृक्षाची शेंडी पिकलेले झावळ बनून खाली पडते. आज महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन नद्यांचे पाणी अडवून गोव्याचे सृष्टीसौंदर्य, जीवनसृष्टी नष्ट करण्यास पुढे सरसावली आहेत. पण हा घाव त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्कीच. खरे!