महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू व्हावा, यासाठी योग्य वेळी विचार करू, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. काही कारणांमुळे आपल्या देशात हे होऊ शकले नाही. आता हा कायदा गोव्यात आहे. उत्तराखंड देखील हा कायदा लागू करणार आहे. हिमाचल करणार आहे, गुजरात देखील करणार आहे. मला वाटते हळूहळू सगळेच राज्ये हा कायदा लागू करतील. मात्र आज मी याबद्दल अधिकृत घोषणा करू शकणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
इन्व्हर्टरमुळे घराला आग; ६ जणांचा होरपळून मृत्यू
उत्तरप्रदेशच्या फिरोजाबादमध्ये इन्व्हर्टरमुळे घराला लागलेल्या भीषण आगीत तब्बल सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाले. घरात लावलेल्या इन्व्हर्टरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली. आगीमुळे एकाच कुटुंबातील नऊपैकी सहा जणांचा मृत्यू झाला, त्यामध्ये तीन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे, अशी माहिती एसएसपी आशिष तिवारी यांनी दिली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.