महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यातून भाजपचे मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांचा एक ताफाच महाराष्ट्रात गेलेला असून त्यांच्या वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आले आहे. वीजमंत्री मिलिंद नाईक, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उद्योगमंत्री महादेव नाईक, आमदार सुभाष फळदेसाई, डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर, गोविंद पर्वतकर आदी नेत्यांचा यात समावेश असून या प्रत्येक नेत्याबरोबर ५० ते ६० कार्यकर्ते प्रचारकार्यात सामील झाले आहेत. भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने वरील कार्यकर्ते तेथील गावांत फिरून प्रचार करीत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावरही पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. बुधवारपासून सलग पाच दिवस सुटी मिळाल्याने अनेक कार्यकर्त्यांना पक्षाच्या सेवेसाठी तेथे जाण्यास अनुकूल वातावरण मिळाले, असे पक्षाचे नेते गोविंद पर्वतकर यांनी सांगितले.