>> १८ आमदारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर काल पार पडला. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्व आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली.
मागील अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा रंगली होती. अखेर ३८ दिवसांनी त्यासाठी मुहूर्त मिळाला. विरोधी पक्षनेते अजित पवारांसह महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. दिल्लीतून मान्यता मिळाल्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. त्यामुळेच दोघांच्याही दिल्ली वार्या सुरू असल्याचा खोटक टोलाही लगावण्यात आला होता. अखेर काल मंत्रिमंडळ विस्तार झाला.
भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे, तर शिंदे गटाकडून मात्र ठाकरे पॅटर्न राबवण्यात आला असून, ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातीलच बहुतेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे, तर भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे.