महायुतीचा प्रस्ताव फेटाळल्यास कॉंग्रेसमध्ये बंडखोरी : सरदेसाई

0
77

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने महायुतीच्या प्रस्तावास पाठिंबा न दिल्यास कॉंग्रेसचे कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडतील अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी अन्य लहान पक्षांनी कॉंग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे वक्तव्य केले असल्याने गोंधळ वाढला आहे.

महागठबंधन म्हणजे प्रत्यक्ष काय, याचाही कॉंग्रेसने विचार केला पाहिजे, असेही सरदेसाई म्हणाले. भाजपचा पराभव करण्यासाठी राज्यात महायुती व्हावी ही जनतेची भावना आहे. या भावनेची कॉंग्रेसने कदर करणे आवश्यक आहे. अर्थपूर्ण महायुती न झाल्यास आपल्यासमोर गोवा फॉरवर्ड हा पर्याय आहे, असे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
दरम्यान, आमदार विश्‍वजीत राणे यांनी महायुतीचा विषय कॉंग्रेसने गंभीरपणे न घेतल्यास आपण पक्षात राहणार नाही, असा इशारा दिल्याने कॉंग्रेसमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. भाजपने येत्या निवडणुकीत गोवा कॉंग्रेसमुक्त करण्याचा निर्धार यापूर्वीच व्यक्त केल्याने आमदार राणे यांच्या भूमिकेचा भाजपाला लाभ होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.