‘महाभारत’ मालिकेत भीम ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे काल निधन झाले. वयाच्या ७४ व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘रक्षा’ या चित्रपटातून प्रवीण कुमार सोबती यांनी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. मात्र, महाभारतातील भीमाच्या भूमिकेमुळे ते खर्या अर्थाने घराघरांत पोहोचले होते.
प्रवीण कुमार हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऍथलिट होते. दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी अनेक सुवर्ण व रौप्य पदके पटकावली होती. १९६७ साली त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.