महापालिकेचे बडतर्फ कर्मचारी जेलभरो आंदोलनाच्या पावित्र्यात

0
76

संपावर असलेल्या पणजी महापालिकेच्या कर्मचार्‍यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आश्‍वासन सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी दिल्याचे कामगार नेते अजितसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व कामगारांनी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.आमरण उपोषण करण्यासाठी जागा नाही. सरकारने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. हे आंदोलन कधी करणार हे जाहीर करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्तपदावरून संजित रॉड्रिग्ज यांना हटविल्याशिवाय कामगारांचा प्रश्‍न सुटू शकणार नाही, ते म्हणाले. ज्या कामगारांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहेत त्यांना पोलिसांमार्फत पत्रे दिली जात आहेत. केशव प्रभू यांच्या संघटनेत सामील व्हा असा सल्लाही कामगारांना दिला जातो. महापालिकेचे उपआयुक्त सुधीर केरकर केशव प्रभू यांची संघटना चालवित असल्याचा आरोप ऍड. राणे यांनी यावेळी केला. महापालिकेत भ्रष्टाचार करणार्‍यांची मांदियाळी आहे, असेही त्यांनी सांगितले.
संपामुळे मृतदेहांची परवड
पणजी महापालिकेच्या कामगारांच्या संपामुळे पणजी स्मशान भूमीत मृतदेहांचे दहन करण्याच्याबाबतीत प्रचंड गैरसोय झाली आहे. त्यामुळे कामगारांचा संप मिटेपर्यंत पणजी व आजूबाजूच्या परिसरातील मृतदेह शवागारामध्ये ठेवावेत, असे हिंदू स्मशान फंड व्यवस्थापन समितीने कळविले आहे.
वरील गंभीर प्रकाराची महापालिकेचे महापौर, आयुक्त, नगरसेवक आणि कामगार नेत्यांनीही दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, जनतेसाठी, शहराची स्वच्छता राखण्याचे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे काम करणार्‍या कामगारांना अल्प वेतन दिले जाते, असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या कामाचे महत्त्व जाणून घेऊन कामगारांना समाधानी ठेवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य लोक व्यक्त करीत आहेत.